तुषारच्या आईप्रमाणेच अनेकांच्या तक्रारी
By admin | Published: August 26, 2016 10:39 PM2016-08-26T22:39:03+5:302016-08-26T23:16:29+5:30
संतोष पोळ विरोधात वाढला ओघ : शवविच्छेदन अहवाल सांगतोय फुप्फुसालासूज आल्याने वॉर्डबॉयचा मृत्यू
राहुल तांबोळी --भुर्इंज --तुषार जाधव याचा खून संतोष पोळ यानेच केल्याची तक्रार त्याची आई नंदा रवींद्र जाधव यांनी बुधवारी वाई पोलिस ठाण्यात दिली. मात्र या तक्रारीची अद्यापपर्यंत दखल घेतली गेली नसल्याचे नंदा जाधव यांनी सांगितले. ‘आपल्या मुलाच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी,’ अशी त्यांची मागणी कायम आहे. दरम्यान, तुषारच्या आईने केलेल्या तक्रारींप्रमाणेच अनेकांच्या नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे.
दरम्यान, तुषार जाधव याच्या शवविच्छेदनाचा अहवाल ‘लोकमत’च्या हाती लागला असून, त्यामध्ये मृत्यूचे कारण ‘फुप्फुसाला सूज येऊन झाल्याचे नोंदवले असून, तुषारच्या शरीरात अल्कोहल आढळून आल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या संदर्भात वैद्यकीय क्षेत्रातून वेगवेगळे मते पुढे येत आहेत.
श्वास कोंडल्याने फुप्फुसाला सूज येते. भुलीच्या औषधाची अतिमात्रा दिल्यावरही श्वास कोंडू शकते तसेच मारहाणीमुळे हाड मोडायला हवे होते किंवा दुखापत होऊन त्याची झालेली गंभीर इजा मृत्यूस कारणीभूत ठरावयास हवी होती. गंभीर इजेची शवविच्छेदन अहवालात नोंद नाही, त्यामुळे या सर्व बाबींची फेर तपासात दखल घ्यावी, अशीही मागणी जाधव यांच्याकडून होत आहे.
घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या तुषार जाधव याला हॉस्पिटलमध्ये मारहाण झाल्याचे समजल्यानंतर नंदा व त्यांचे पती रवींद्र घोडवडेकर हॉस्पिटलमध्ये गेले होते. तुषारला रुग्णवाहिकेतून साताऱ्याला नेताना आई-वडील सोबत गेले होते. तुषारची प्रकृती गंभीर होती तर घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब, आयसीयू असताना त्याच्यावर तेथे उपचार का सुरू केले नाहीत?
नंदा जाधव या अशा सर्व घटनांच्या साक्षीदार आहेत. संतोषने त्यांच्यासमोरच तुषारला पाचवड गावानजीक कसलेसे इंजेक्शन दिले. संतोषने इतर खुनांमध्ये केलेला इंजेक्शनचा वापर उघड झाल्याने तुषारला दिलेले ते इंजेक्शन कोणते? या प्रश्नामुळेच नंदा जाधव यांनी संतोष यानेच तुषारचा खून केल्याचा आरोप केला आहे. २५ मे २०१४ रोजी घडलेल्या घटना स्वत:च्या नजरेने पाहिल्याने व त्याचा उलगडा संतोष पोळ याचा क्रूर चेहरा समोर आल्याने नंदा जाधव यांनी वाई पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार दिली आहे.
तुषार जाधव याच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण नमूद करण्यात आले आहे. त्या कारणामुळेही संशयाची सुई संतोष पोळकडे वळली आहे. भुलीच्या औषधाची अतिमात्रा झाली तर श्वास कोंडू शकतो आणि फुप्फुसाला सूज येते, अशी माहिती वैद्यक शास्त्रातील तज्ज्ञांकडून दिली जात आहे. तसेच मारहाणीमुळे तुषारचा मृत्यू झाला, असा आरोप आहे तर अहवालात त्या अनुषंगाने निरीक्षण नोंदवले असते. तसेच तुषारच्या शरीरात जे अल्कोहल आढळून आले ते नेमके कोठून आले, कारण घटनेच्या अवघ्या काहीकाळ आधी तुषार घरीच होता. शवविच्छेदनाच्या अहवालाचा जो तुषारच्या नातेइवाइकांना जो काही उलगडा झाला आहे, त्यावरून त्यांचा संशय अधिक बळकट झाला असून, तुषारच्या खुनाची चौकशी करावी, या मागणीचा त्यांनी पुनर्विचार केला आहे. मात्र, त्या तक्रारीची अद्याप दखल घेतली गेली नाही, असा आरोप तुषारच्या आईने केला आहे. (प्रतिनिधी)
अनेकांच्या मनात शंका
पोलिस निरीक्षक राजेश नाईक, तुषार जाधव यांच्या खुनाचा संशय संतोष पोळवर घेतला जात असतानाच अशा प्रकारच्या तक्रारींचा ओघ वाई पोलिस ठाण्यात वाढू लागला आहे. घोटवडेकर हॉस्पिटलमध्ये ज्या-ज्या रुग्णांचा मृत्यू झाला आहे, त्यातील अनेकांच्या नातेवाईकांच्या मना शंकेची पाल चुकचुकत आहे.