टीव्हीवरचे परीक्षकच संमेलनांच्या मंचावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 3, 2016 10:01 PM2016-01-03T22:01:47+5:302016-01-04T00:52:37+5:30
विश्वास पाटील यांची नाराजी : ताकदीचे साहित्यिक दुर्लक्षित; कसदार साहित्यावरही चर्चा नाही
सातारा : ‘टीव्ही चॅनेलवरच्या कार्यक्रमात जे परीक्षक म्हणून दिसतात, तेच साहित्य संमेलनाच्या मंचावर अवतरतात; मात्र ताकदीचे साहित्यिक दुर्लक्षितच राहतात. त्यांच्या कसदार साहित्यावर चर्चाही होत नाही,’ अशा शब्दांत ख्यातनाम कादंबरीकार विश्वास पाटील यांनी संमेलनांबद्दल नाराजी व्यक्त केली. ‘इतिहासातील वास्तवावर कल्पनेचं कलम करायचं असेल, तर विशाल दृष्टी असावी लागते,’ असे म्हणत त्यांनी ‘बाजीराव-मस्तानी’ चित्रपटाचे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना चिमटा काढला.
जिल्हा ग्रंथ महोत्सवाचा समारोप विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत रविवारी झाला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे अध्यक्षस्थानी होते. यावेळी कुलसचिव व्ही. एन. शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष माणिकराव सोनवलकर, उपाध्यक्ष रवी साळुंखे, प्रा. यशवंत पाटणे आदी मान्यवर उपस्थित होते. ‘सलग सोळा वर्षे ग्रंथ महोत्सव आयोजित करण्याची मर्दुमकी गाजविणाऱ्या सातारकरांनी इतिहास जपण्याच्या बाबतीत मागे राहू नये आणि पर्यटनाच्या दृष्टीने ऐतिहासिक स्थळांचा फेरविचार करावा,’ अशी अपेक्षा पाटील यांनी व्यक्त केली.
‘माझ्या पिढीत राजन खान, राजन गवस यांच्यासारखे ताकदीचे लेखक निर्माण झाले. मात्र संमेलनांच्या व्यासपीठावरून त्यांची दखल घेतली गेली नाही. साताऱ्याहून कोल्हापूरला पायी जाणाऱ्या महिलेची कहाणी ‘७२ मैल’सारख्या कादंबरीत मांडली गेली. परंतु अशा सकस साहित्यावर संमेलनांमध्ये चर्चाही झाली नाही,’ असे सांगून पाटील म्हणाले, ‘मोगले आझमसारख्या भव्य चित्रपटाशी बरोबरी करण्याचा प्रयत्न ‘बाजीराव-मस्तानी’मध्ये दिसतो; मात्र अनारकली नावाचे पात्रही इतिहासात नसताना साकारलेला मोगले आझम
भव्य दृष्टीमुळेच उभा राहिला. प्रतिभेच्या पंखांना वास्तवाचा आधार नसेल तर कलाकृती काळाच्या कसोटीवर टिकत नाही. ‘बाजीराव-मस्तानी’तील राधाबाई, चिमाजी अप्पा ही पात्रे त्यांच्या मूळ प्रतिमेशी जुळत नाहीत.’
‘लस्ट फॉर लालबाग’ ही आपली नवी कादंबरी साकारताना दिवंगत पोलीस अधिकारी विजय साळसकर यांच्याशी झालेल्या गप्पांचा, लहानपणापासून अनुभवलेल्या चाळीतील जीवनाचा, त्याच मुंबईचा जिल्हाधिकारी म्हणून काम करताना आपल्यासमोर नोंदविलेल्या गुन्हेगारांच्या जबाबाचा, गिरणी कामगारांचा लढा प्रत्यक्ष पाहिल्याचा फायदा झाल्याचे पाटील यांनी सांगितले. ‘विषयानुसार आशय आणि भाषा वळविता आली पाहिजे,’ असा कानमंत्रही नव्या लेखकांना दिला. ‘साहित्यिकांसाठी असलेल्या विधान परिषदेच्या जागा यशवंतराव चव्हाण आणि वसंतदादा पाटील असेपर्यंत साहित्यिकांनाच मिळाल्या. कर्नाटकात मात्र पंधरा वर्षांपूर्वी असा एक प्रसंग घडताच कन्नड जनतेने उठाव केला,’ असे सांगत ‘मराठीवर प्रेम करायला कन्नड माणसांकडून शिका,’ असे ते म्हणाले.
शिरीष चिटणीस यांनी प्रास्ताविक केले. यावेळी माणिकराव सोनवलकर, रवी साळुंखे यांची भाषणे झाली. (प्रतिनिधी)
‘पानिपत’मध्ये कोट्यवधींचे व्यवहार
‘पानिपत’ नावाचा बंगला कोल्हापुरात बांधल्यावर एक साधू ‘अल्लख निरंजन’ म्हणत हजर झाला. त्याने वास्तूचा वास घेऊन माझ्या कपाळाला अंगारा लावला आणि ‘या वास्तूत कोट्यवधींचे व्यवहार होतील,’ असे सांगितले. या महाराजांचे भाकित खरे ठरले. त्या वास्तूत खरोखर कोट्यवधींचे व्यवहार होतात; कारण मी ती बँकेला भाड्याने दिली आहे, अशी आठवण पाटील यांनी सांगताच हास्यकल्लोळ उडाला.
‘पाटील’ असून शब्दांच्या फडात
‘पाटील’ नावाच्या व्यक्ती केवळ तीन फडांमध्ये दिसतात. कुस्त्यांचा फड, उसाचा फड किंवा तमाशाचा फड. मात्र ‘पाटील’ अडनाव असूनही मी शब्दांच्या फडात रमलो, असे विश्वास पाटील यांनी सांगताच हशा पिकला. ‘मलबार हिल इतक्या वर्षांनंतरही जशीच्या तशी राहिली. लालबाग-परळ मात्र पूर्णपणे बदलले. संपातून तगलेला गिरणी कामगार जागतिकीकरणाने संपविला. असंख्य कामगारांना देशोधडीला लावणाऱ्यांपैकी एकालाही सजा झाली नाही,’ असा भेदक हल्ला त्यांनी ‘लस्ट फॉर लालबाग’च्या संदर्भात बोलताना चढविल्यावर मात्र श्रोते तितकेच गंभीर झाले.
साताऱ्याच्या मुलीने फुगा फोडला
‘पानिपत’ गाजल्यावर आपल्यालाही थोडी गर्वाची बाधा झाली होती, अशी प्रांजळ कबुली देऊन विश्वास पाटील म्हणाले, ‘हा फुगा पाचवीत शिकणाऱ्या साताऱ्याच्या मुलीने फोडला. पार्वतीबाई भाऊसाहेबांच्या केसातून बोटे फिरवितात, असा प्रसंग मी ‘पानिपत’मध्ये लिहिला आहे. त्यावर या मुलीचे मला पत्र आले. पेशवाईत सर्व पुरुष डोक्याचा गुळगुळीत गोटा करीत असत; मग भाऊसाहेबांच्या केसातून पार्वतीबार्इंनी बोटे कशी फिरविली, असा त्या मुलीचा प्रश्न होता. तिला मी माझ्या परीने उत्तरही पाठविले; पण पुन्हा गर्व केला नाही.’
कल्याणी हायस्कूलचा ‘गिद्दा’ प्रथम
ग्रंथ महोत्सव : शाळकरी मुलांच्या कलागुणांनी सजला सांस्कृतिक कार्यक्रम
सातारा : जिल्हा ग्रंथ महोत्सवात रविवारची सकाळ लहानग्यांच्या कलागुणांनी बहरली. सुमारे पंचवीस बहारदार समूहनृत्ये या कार्यक्रमात पाहायला मिळाली. कल्याणी हायस्कूलच्या पंजाबी ‘गिद्दा’ नृत्याने माध्यमिक गटाच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. मूकबधिर विद्यालयाच्या संघाने द्वितीय, तर करंजे येथील कन्या विद्यालयाने तृतीय क्रमांक पटकावला.
प्राथमिक गटात अण्णासाहेब राजेभोसले विद्यामंदिराच्या वाघ्या-मुरळी नृत्याने प्रथम, आबासाहेब चिरमुले शाळेच्या धनगरी गजा नृत्याने द्वितीय, तर नवीन मराठी शाळेच्या ‘घे पाऊल पुढे जरा’ या गीतावरील समूहनृत्याने तृतीय क्रमांक पटकावला. ज्युनिअर कॉलेज गटात जिजामाता ज्युनिअर कॉलेजने सादर केलेले नृत्य सर्वोत्कृष्ट ठरले.
सुमारे तीन तास मुलांच्या कलागुणांचा हा सांस्कृतिक सोहळा रंगला. ‘सूर निरागस हो’ या गीतावरील नमन-खेळे आणि भरतनाट्यम याच्या गोकूळ स्कूलने केलेल्या फ्यूजनने कार्यक्रमाची सुरुवात केली. यशोदा पब्लिक स्कूलने शेतकरी नृत्य सादर केले. कल्याणी प्राथमिक शाळेने ‘धरती नांगरलेली’ गीतावर नृत्य सादर केले, तर जिजामाता प्रॅक्टिसिंग स्कूलने देवीचा गोंधळ सादर केला.
माध्यमिक गटात एकाहून एक सरस सोळा नृत्ये सादर झाली. रामेश्वर हायस्कूलने आणि करंजे येथील कन्या महाविद्यालयाने ‘बेटी बचाओ’ या थीमवर नृत्य सादर केले. भीमाबाई आंबेडकर हायस्कूलचा भांगडा, मुलींच्या माध्यमिक शाळेचे शेतकरी नृत्य, इक्रा इंग्लिश मीडियम स्कूलचे ‘देस मेरे’ गीतावरील सर्वधर्मसमभावाचे दर्शन घडविणारे नृत्य, महाराजा सयाजीराव विद्यालयाचे धनगरी नृत्य, लोकमंगल स्कूल गेंडामाळ या शाळेचे आराधी नृत्य, कन्याशाळेने ‘फना’ चित्रपटातील गीतावरील नृत्य, मतिमंद मुलांच्या शाळेचे वाघ्या-मुरळी, लोकमंगल हायस्कूल एमआयडीसी शाळेचे शेतकरी नृत्य, साधना इंग्लिश मीडियम स्कूलचे ‘इंडियावाले’ ही नृत्ये प्रभावी ठरली. (प्रतिनिधी)
...आणि काळजाचा ठोका चुकला
कार्यक्रमात अनेकदा तांत्रिक बिघाडामुळे गाण्याची सीडी बंद पडण्याचे प्रकार घडले. गाणे थांबले की नृत्य थांबत होते. तथापि, मूक-बधिर विद्यालयाचे नृत्य सुरू असताना गाणे बंद पडले तरी मुला-मुलींची पावले थिरकतच राहिली. ही मुले नृत्याचे धडे कसे गिरवत असतील, याचा अनुभव त्याच क्षणी प्रेक्षकांना आला आणि बिनसंगीताचे नृत्य पूर्ण होईपर्यंत सर्वांनी टाळ्या वाजविणे सुरूच ठेवले. काहीजणांच्या डोळ्यात चक्क पाणी आले. नृत्य संपल्यावर पुन्ही सीडी लावून या मुलांना उत्स्फूर्त ‘वन्स मोअर’ देण्यात आला.