एक एकरात बाराशे साग
By admin | Published: September 7, 2015 08:58 PM2015-09-07T20:58:02+5:302015-09-07T20:58:02+5:30
शिक्षकांचा प्रयत्न : ठिबकने देतात पाणी
आदर्की फलटण तालुक्याच्या कायम दुष्काळी भागातील दोन शिक्षकांनी पाणी, मजूर दुष्काळावर मात करीत पर्यावरणाचा विचार करून एका शिक्षकाने एक एकर क्षेत्रात १२०० सागवाणाची झाडे लावली आहेत.
फलटण तालुक्यात पावसाची वानवा. भाजीपाला केला, तर मजुराचा प्रश्न यावर मात करीत आदर्की खुर्द येथील दोन शिक्षकांनी सागवण लागवडीचा निर्णय घेतला. त्यापैकी सुनील हरिभाऊ बोडके यांनी जोगमठाच्या पायथ्याशी डोंगराच्या कडेला माळरान क्षेत्राचे सपाटीकरण करून बोरीचे शेत नावाच्या शिवारात आॅस्टेलियन सुपर फास्ट वाणाची १२०० रोपे आणून पाच बाय पाच अशी लागण १४ जून २००८ मध्ये लागण केली व ठिबक सिंचनच्या साह्याने पाणी उन्हाळ्यात द्यावे लागते.
गावापासून चार किलोमीटर अंतरावर शेत असल्याने मजुरांना ने-आण करणे. त्यांची रोजंदारी त्याबरोबर घराच्या लोकांना होणारा त्रास कमी झाला. आज सात वर्षांत २० फूट उंच सागवणाची झाडे झाली आहेत. त्यामुळे स्वायत्त उत्पन्न, पर्यावरणाचे संतुलीकरण, पाण्याची बचत झाली. त्यामुळे शिक्षक सुनील बोडके यांना अजून आठ वर्षांनी शाश्वत फायदा होणार आहे. त्यांचे भाऊ बीएस्सी अॅग्री होऊन एमपीएससी परीक्षा देताना त्यांना पर्यावरणविषयक प्रश्न विचारला. तेव्हा त्यांनी शेतात सागवणाची लागण केल्याची माहिती दिली. त्यांना चांगले गुण मिळून पीएआयची परीक्षा देऊन ते मुंबई येथे पोलीस दलात कार्यरत आहेत.
ज्या शेतकरी वर्गाकडे जमिनी जास्त आहेत, मजूर व भांडवल कमी आहे. त्यांनी हलक्या जमिनीत झाडांची लागण करून पर्यावरणाचा ऱ्हास थांबवावा.
आम्ही शेतात सागवण लावल्यामुळे मजुरी वाचली, इंधन वाचले
घरचे आई व वडिलांचा त्रास वाचला व भावाचे शिक्षण झाले व रोपे सात वर्षांची झाली.
आता आठ वर्षांनी पूर्ण वाढ झाल्यानंतर शाश्वत उत्पन्न मिळणार असल्याचे निश्चित आहे.
दुष्काळी भाग म्हणून कायम ओरड करण्यापेक्षा मी यावर मात करण्याचे ठरविले. विविध ठिकाणांहून माहिती घेत त्यानुसार शेतीतज्ज्ञांचा सल्ला घेत मी शेती फुलविण्याचा संकल्प केला. या संकल्पाला कुटूंबीय आणि ग्रामस्थांनीही साथ दिली. पहिल्यांदा हे जमेल का अशी धाकधूक होती. आत्मविश्वासाने सामोरे गेलो आणि धरणी माताने मला भरभरून दिले. आज माझी ही शेती सर्वांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.
- सुनील बोडके