‘टेंभू’ची बारा लाखांची तार लंपास
By admin | Published: September 17, 2015 12:48 AM2015-09-17T00:48:22+5:302015-09-17T00:51:49+5:30
माहुलीतील घटना : चाकू, लोखंडी गजाचा धाक दाखवून कृत्य
विटा : माहुली (ता. खानापूर) येथे टेंभू योजनेच्या टप्पा क्र. ३ वरील विद्युत साहित्याच्या गोदामामधील पहारेकरी व आॅपरेटरना लोखंडी गज व चाकूचा धाक दाखवून चोरट्यांनी ११ लाख ७० हजार रुपये किमतीची सुमारे २३४ मीटर तांब्याची तार लंपास केली. ही घटना मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास घडली. या घटनेने प्रचंड खळबळ उडाली असून, तार लंपास करण्यासाठी वापरण्यात आलेल्या चारचाकी वाहनांचे क्रमांक विटा पोलिसांच्या हाती लागले आहेत.
माहुली येथे टेंभू योजनेच्या टप्पा क्र. ३ मध्ये महालक्ष्मी इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड कंपनीच्या विद्युत साहित्याचे गोदाम आहे. त्यात अक्षयकुमार रामचंद्र पवार, परशुराम तोरणे व विश्वास कचरे हे तीन आॅपरेटर आणि चंद्रकांत भोसले हा पहारेकरी वास्तव्यास आहेत. मंगळवारी पहाटे चारच्या सुमारास सात ते आठ चोरट्यांनी गोदामाचे तारेचे कुंपण तोडून टेम्पो व मारुती व्हॅन गोदामामध्ये आणली. त्यावेळी चोरट्यांनी ११ लाख ७० हजार रुपये किमतीची सुमारे २३४ मीटर तांब्याची तार आणलेल्या गाड्यात भरली. वाहनांच्या आवाजाने आपरेटर व पहारेकरी झोपेतून जागे झाले. अक्षयकुमार पवार यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांनी चोरट्यांकडे धाव घेतली. मात्र चोरट्यांनी कर्मचाऱ्यांना लोखंडी गज व चाकूचा धाक दाखवून तार लंपास केली. बुधवारी आॅपरेटर अक्षयकुमार पवार यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली. त्यावेळी पोलिसांना चोरट्यांनी चोरीत वापरलेल्या वाहनांचे क्रमांकही मिळाले आहे. त्याची माहिती पोलिसांनी गोपनीय ठेवली आहे. पोलीस तपास करीत आहेत. (वार्ताहर)