बारा स्वच्छतागृहे आली दिमतीला!

By admin | Published: July 12, 2015 12:34 AM2015-07-12T00:34:25+5:302015-07-12T00:35:56+5:30

फिरते शौचालयही : ‘स्वच्छ-सुंदर सातारा’साठी पालिका प्रशासन सरसावले

Twelve sanitary sheets have come! | बारा स्वच्छतागृहे आली दिमतीला!

बारा स्वच्छतागृहे आली दिमतीला!

Next

दत्ता यादव / सातारा
सातारा शहर हे एलईडी, स्मार्ट सीटीच्या दिशेने वाटचाल करत असतानाच आता स्वच्छ आणि सुंदर सातारा सीटी होण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले आहे. एक फिरते शौचालय आणि बारा स्वच्छतागृहे नागरिकांच्या सेवेस लवकरच सज्ज होणार असल्याने नागरिकांची कुचंबणा तर थांबणारच; शिवाय नागरिकांचे आरोग्यमानही उंचावणार आहे.
शहरामध्ये इन मीन तीन शौचालये आणि पाच ते सहा स्वच्छतागृहे आहेत. स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय आहे. त्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात कुचंबणा होऊ लागली आहे. त्यामध्ये विशेषत: महिलांपुढे मोठी अडचण आणि समस्या निर्माण होत असते. अशा खासगी गोष्टीवर महिलांना उघडपणे बोलता येत नसल्यामुळे प्रशासनापर्यंत ही महत्त्वाची समस्या आत्तापर्यंत पोहोचत नव्हती. मात्र दोन दिवसांपूर्वी झालेल्या वॉर्ड कमिटीच्या बैठकीत हाच महत्त्वाचा मुद्दा चर्चेला गेला. आणि कमिटीतील सदस्यांनी स्वच्छतागृह नसल्यामुळे होणाऱ्या अडचणी मांडल्या. त्यामुळे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जागा दाखवा.. स्वच्छतागृहे उभारू, असे सांगितले होते. मात्र जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळालेला दिसून आला नाही. त्यामुळे पुढे होऊन आपल्यालाच यावर तोडगा काढावा लागणार असल्याचे पालिका प्रशासनाला मीहिती असल्याने ‘स्वच्छ सातारा’साठी प्रशासनाने तातडीने हालचाली सुरू केल्या, तसेच त्याची अंमलबजावणीही केली.
शहरामध्ये आत्तापर्यंत महिलांसाठी रस्त्यावर आणि मोक्याच्या ठिकाणी एकही स्वच्छतागृह नव्हते. त्यामुळे महिलांसाठी ७ सिंगल स्वच्छतागृहे आणि पुरुषांची ५ डबल स्वच्छतागृहे पालिकेने नुकतीच खरेदी केली आहेत. शहरातील राजवाडा, पाचशेएक पाटी, पोवई नाका, बसस्थानक, जुना मोटार स्टॅण्ड आदी मोक्याच्या ठिकाणी ही स्वच्छतागृहे ठेवण्यात येणार आहेत. या भागातील स्थानिक नगरसेवक आणि तेथील नागरिकांना विश्वासात घेतले जाणार आहे. आपल्या घराजवळ स्वच्छतागृह नको, अशी अनेक लोकांची तक्रार असते. त्यामुळे अशा तक्रारींचे निराकरण करताना पालिका प्रशासनाची दमछाक होणार आहे. स्वच्छ आणि सुंदर सातारासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे पालिका प्रशासनाचे म्हणणे आहे.
घंटागाड्यांना ‘जीपीएस’ यंत्रणा
शहरातील नागरिकांच्या घरोघरी जाऊन कचरा गोळा करणाऱ्या घंटागाड्याही अत्याधुनिक बनविण्याचे काम पालिकेने हाती घेतले आहे. ३९ वॉर्डमध्ये असलेल्या घंटागाड्यांना ‘जीपीएस’ यंत्रणा बसविण्यात आली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाचे काम अत्यंत हलके झाले आहे. या ‘जीपीएस’ यंत्रणेमुळे घंटागाड्यांच्या खेपा किती झाल्या हे समजणार आहे. तसेच घंटागाडी शहरामध्ये कुठे आहे, कोणत्या परिसरात जाते हे समजणार असल्याने रोज कचऱ्याची विल्हेवाट लावली जाणार आहे.
आंदोलनकर्त्यांची गैरसोय टळली
शहरामध्ये स्वच्छतागृहे ठेवण्यात आल्यानंतर येत्या दोन दिवसांत फिरते शौचालयही नागरिकांच्या सेवेस सज्ज होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेहमी आंदोलन, मोर्चे होत असतात. या ठिकाणी कसलीही सोय नसल्यामुळे आंदोलनकर्त्यांची कुंचबणा होत होती. आता या फिरत्या शौचालयामुळे आंदोलनकर्त्यांची गैरसोय टळणार आहे. तसेच शहरामध्ये अनेकदा मोठे सार्वजनिक कार्यक्रमही होत असतात. त्यावेळीही या फिरत्या शौचालयाचा सातारकरांना उपयोग होणार आहे. आता १२ स्वच्छतागृहे आणि एक फिरते शौचालय चोवीस तास उपलब्ध होणार असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.
 

Web Title: Twelve sanitary sheets have come!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.