जिल्ह्यात विषारी सापांच्या बारा प्रजाती..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:49 AM2021-06-16T04:49:41+5:302021-06-16T04:49:41+5:30

सातारा : जिल्ह्यात ५५ जातींचे वेगवेगळे साप आहेत. यामध्ये विषारी, निमविषारी आणि बिनविषारी या प्रकारात मोडतात. यातील १२ ...

Twelve species of venomous snakes in the district ..! | जिल्ह्यात विषारी सापांच्या बारा प्रजाती..!

जिल्ह्यात विषारी सापांच्या बारा प्रजाती..!

Next

सातारा : जिल्ह्यात ५५ जातींचे वेगवेगळे साप आहेत. यामध्ये विषारी, निमविषारी आणि बिनविषारी या प्रकारात मोडतात. यातील १२ साप हे विषारी असून, हे साप विशेषत: पावसाळ्यात बाहेर पडत असतात. त्या वेळी नागरिकांनी काळजी घेतली पाहिजे. साप दिसल्यास त्याला न मारता वनविभाग किंवा सर्पमित्राला बोलवणे गरजेचे आहे.

सातारा जिल्ह्यात घनदाट जंगल पाटण आणि महाबळेश्वर तालुक्यात आहेत. या तालुक्यामध्ये सर्वाधिक साप आपल्याला पाहायला मिळतात. घनदाट जंगलामध्ये पिटवायपर आणि मलबार पिटवायपर या जातीचे साप आढळून येतात. त्याचबरोबर कोरल जातीचाही साप आढळून येतो. सापांच्या वेगवेगळ्या जाती असतात. विषारी सापांमध्ये नाग, मण्यार, घोणस, फुरसे यांचा समावेश होतो. तर निमविषारीमध्ये हारंटोळ जातीबरोबरच मांजऱ्या जातीचे विविध तीन साप आढळून येतात. तसेच धामण, गवत्या, वेरूळ, विरेकर, मांडळू, धूळ नागीण या जातींचा सापाचा बिनविषारीमध्ये समवेश आहे. त्याचबरोबर जिल्ह्यात चित्रांगण आयकुळ हा दुर्मिळ जातीचा सापही आढळून येतो. अशा प्रकारच्या सापांच्या जाती आहेत.

साप चावला तर...

साप चावल्यानंतर माणूस फार घाबरून जातो. त्यामुळे त्याचा हृदयाचा वेग वाढून शरीरात विष अधिक गतीने पसरू लागते. म्हणून धैर्य आणि विश्वास बाळगा. प्रथम एका सुरक्षित, मोकळ्या जागेवर जा व खाली बसून घ्या. एकटे असाल तर त्वरित १०८ किंवा ११२ नंबरवर फोन करून अॅम्ब्युलन्सला थोडक्यात आपली माहिती सांगा. जवळच्या लोकांना बोलावून घ्या. एकटे नसाल तर आजूबाजूच्या लोकांची मदत घेऊन लवकरात लवकर रुग्णालयात जा. सैल कपडे करा, जखमेतून रक्त व्हावू द्या.

नाग : नागाच्या डोक्यामागील काही बरगड्या अतिशय लवचीक असतात. त्यामुळे नागाला फणा काढणे शक्य होते. नागाच्या साधारणपणे ६-८ बरगड्या फणा काढण्यालायक असतात.

मण्यार : मण्यारचे विष हे नागाप्रमाणेच असते इंग्रजीत त्याला Neurotoxic म्हणतात व त्याचा प्रभाव शरीराच्या संवेदन प्रणालीवर होतो. मण्यारचे विष नागाच्या विषाच्या १५ पटीने जहाल असते.

घोणस : घोणसाला ओळखण्याची मुख्य खूण म्हणजे त्याच्या अंगावरील साखळीसारख्या दिसणाऱ्या तीन समांतर रेषा असतात. घोणस हिरवा, पिवळा, हलका, करडा रंग व इतर अनेक रंगछटांमध्ये आढळतात.

फुरसे : फुरसे एक लहानसर (लांबी ४६-५५ सेंमी.) साप आहे; पण कधीकधी ७९ सेंमी. लांबीचे नमुनेही आढळतात. यांचा रंग तपकिरी, फिकट पिवळसर किंवा वाळूसारखा असतो.

- लोकवस्तीमध्ये साप दिसल्यास प्रथम वनविभागाला अथवा सर्पमित्राला बोलवा. अनेकदा लोक धाडस करून साप पकडण्याचा प्रयत्न करतात. मात्र, हे चुकीचे असून, जिवावर बेतण्यासारखे आहे. अनेकांना बिनविषारी आणि निमविषारी सापांची जात ओळखत नाही. त्यामुळे वेळ जातो. सर्पदंश झाल्यास तत्काळ रुग्णालयात जावा. अमित सय्यद, सर्पमित्र, सातारा

जिल्ह्यातील आढणारे बिनविषारी साप...

सर्वच साप विषारी नसतात. बिनविषारीही साप सातारा जिल्ह्यात आहेत. त्यामध्ये धामण, गवत्या, वेरळ, मांडूळ, विरेकर या जातींच्या सापाचा समावेश आहे. या सापाने माणसाचा चावा घेतला तरी माणसाचा मृत्यू होत नाही. मात्र, या जातींचे साप ओळखता येत नाहीत. त्यामुळे साप चावल्यास तत्काळ दवाखान्यात जाणे गरजेचे आहे.

Web Title: Twelve species of venomous snakes in the district ..!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.