अठ्ठावीस गावांना दूषित पाणी
By admin | Published: July 11, 2014 12:35 AM2014-07-11T00:35:57+5:302014-07-11T00:39:56+5:30
वैद्यकीय अधिकाऱ्यांची माहिती : ग्रामपंचायतींना बजावल्या नोटिसा
कऱ्हाड : तालुक्यातील अठ्ठावीस गावांना दूषित पाणीपुरवठा होत असून संबंधित ग्रामपंचायतींना नोटीस देण्यात आल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी सुनील कोरबू यांनी गुरूवारी पंचायत समितीच्या सभेत बोलताना दिली. आरोग्य विभागाच्या वतीने पाण्याचे नमुने तपासण्यात आले होते. या तपासणीत संबंधित अठ्ठावीस गावांतील पाण्याचे नमुने दूषित असल्याचा अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाल्याचेही डॉ. कोरबू यांनी यावेळी स्पष्ट केले.
येथील पंचायत समितीची मासिक सभा सभापती देवराज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. उपसभापती विठ्ठलराव जाधव, गटविकास अधिकारी अरविंद पाटील उपस्थित होते. धोंडिराम जाधव यांनी ग्रामसेवकांच्या आंदोलनामुळे अनेक गावांची कामे प्रलंबित राहिली आहेत, असे सांगितले. त्यावर मुख्यमंत्र्यांसह ग्रामविकास मंत्री व सहकार मंत्र्यांनी चर्चा करून तोडगा काढण्याचा ठराव करण्यात आला.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुनील कोरबू म्हणाले, तालुक्यातील सुपने, साजूर, गोटे, कोरेगाव, वडगाव हवेली, शेरे, कापील, गोळेश्वर, शेणोली, भोसलेवाडी, येणके, कुसूर, वडगाव, भांबे, मस्करवाडी, चोरे, हेळगाव, बेलवडे बुद्रुक, करवडी, टेंभू, बाबरमाची आदी गावांतील पाण्याचे नमुने दूषित आले आहेत. त्यांना नोटीस पाठविल्या आहेत.
टेंभू येथील आगरकर हायस्कूलमध्ये दहावी पास झालेल्या विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला मिळत नाही. संबंधित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीस माध्यमिकच्या शिक्षणाधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात यावे, अशी मागणी यावेळी धोंडिराम जाधव यांनी केली.
यावेळी सभापती देवराज पाटील आक्रमक झाले. पंचायत समितीचा शिक्षण विभाग तातडीने माध्यमिक विभागाला याबाबत कल्पना देईल, असे गायकवाड यांनी
यावेळी सभागृहाला सांगितले. (प्रतिनिधी)