‘सह्याद्री’त चोवीस तास ‘वॉच’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2021 04:33 AM2021-05-03T04:33:11+5:302021-05-03T04:33:11+5:30
कऱ्हाड : ‘सह्याद्री’च्या अधिवासात शेकडो प्रजातींचे हजारो प्राणी वावरत असताना या प्राण्यांच्या हालचाली पूर्वी पडताळता येत नव्हत्या. अभ्यासकांना वन्यजीवनाचा ...
कऱ्हाड : ‘सह्याद्री’च्या अधिवासात शेकडो प्रजातींचे हजारो प्राणी वावरत असताना या प्राण्यांच्या हालचाली पूर्वी पडताळता येत नव्हत्या. अभ्यासकांना वन्यजीवनाचा जवळून अभ्यासही करता येत नव्हता. मात्र, प्रकल्पात कॅमेऱ्याची संख्या वाढविण्यात आल्यामुळे सध्या अनेक प्राण्यांच्या हालचाली या कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत. तसेच त्यांचे फोटोच वन्यजीव विभागाच्या हाती येत आहेत.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात शेकडो प्रजातीचे हजारो प्राणी आढळतात. या प्राण्यांची नोंद ठेवणे सहजशक्य नसते. मात्र, त्यांच्या हालचाली टिपण्यासाठी प्रकल्पात दोनशेंहून जास्त कॅमेरे लावण्यात आले आहेत. चोवीस तास या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रकल्पातील प्राण्यांची छायाचित्रे घेतली जाताहेत. वेगवेगळे प्राणी येथे कॅमेराबद्ध होत असताना दीड वर्षांपूर्वी प्राणीप्रेमींसह वन्यजीव विभागाला सुखद धक्का बसला. दोन पट्टेरी वाघ कॅमेऱ्यात कैद झाले आणि प्रकल्पात वाघांचे अस्तित्व असल्याचा ठोस पुरावाच सर्वांच्या हाती लागला.
वास्तविक, या प्रकल्पाच्या निर्मितीनंतर केवळ वाघाच्या पायाचे ठसे, त्याची विष्ठा आणि स्थानिकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे वाघाचे अस्तिव असल्याची माहिती वनविभागाकडे होती. मात्र, त्यासंबंधी कोणत्याही प्रकारचे शास्त्रीय पुरावे उपलब्ध नव्हते. कोकणपट्ट्यामध्ये वाघाचे दर्शन होत असल्याची माहिती वारंवार स्थानिकांकडून देण्यात येत होती. मात्र, त्याला दुजोरा मिळत नव्हता. अखेर २०१६ साली कॅमेरा ट्रॅपिंगचा आधार घेण्यात आला. त्यासाठी भारतीय वन्यजीव संस्थान या संस्थेतर्फे प्रकल्पाच्या संपूर्ण परिक्षेत्रात २२५ कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले. गत साडेचार वर्षांत या कॅमेऱ्यांनी वाघासह इतर प्राण्यांच्या हालचालीही टिपल्या आहेत.
- चौकट
... असा आहे व्याघ्र प्रकल्प!
१, १६५ चौ. कि. मी. - कोअर, बफरसह एकूण क्षेत्र
३१७.६७० चौ. कि. मी. - चांदोली राष्ट्रीय उद्यान
४२३.५५० चौ. कि. मी. - कोयना वन्यजीव अभयारण्य
- चौकट
संवर्धन राखीव वनक्षेत्र
६५११ : जोर-जांभळी
९३२४ : विशाळगड
७२१९ : पन्हाळा
१०५४८ : गगनबावडा
२४६६३ : आजरा-भुदरगड
२२५२३ : चंदगड
५६९२ : आंबोली-दोडामार्ग
(सर्व क्षेत्र हेक्टरमध्ये)
- चौकट
वाघ चारवेळा कॅमेऱ्यात कैद
१) २०१० : पुसटशी छबी. खात्री नाही.
२) २३ मे २०१८ : सायंकाळी ६.३६ वा.
३) २४ मे २०१८ : मध्यरात्री १२.५२ वा.
४) २८ एप्रिल २०२१ : रात्री ११.४० वा.
- कोट
लुप्त होण्याचा धोका असलेल्या व केवळ याच भागात आढळणाऱ्या वनस्पती, प्राणी, पक्षी व इतर प्रजातींनी सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा प्रदेश अतिशय समृद्ध आहे. येथे २५४ प्रजातीच्या पक्ष्यांची नोंद झाली आहे. तसेच सरपटणारे, सस्तन आणि उभयचर प्राणीही येथे मोठ्या प्रमाणावर आहेत.
- रोहण भाटे
मानद वन्यजीव रक्षक
- चौकट
‘लेपर्ड कॅट’सह चौसिंगाही कैद
सह्याद्री प्रकल्पात लावण्यात आलेल्या वेगवेगळ्या कॅमेऱ्यांमध्ये वाघ, बिबट, सांबर, भेकर, चौसींगा, गवा, अस्वल, साळींबर, रूडीमुंगूस, पिसोरी, स्मॉल इंडियन सिवेट, एशियन पाम सिवेट, लेपर्ड कॅट, जंगल कॅट आदी महत्त्वाच्या प्राण्यांसह गरुड, निलगिरी शैल कस्तुर आदी पक्षीही कॅमेराबद्ध झाले आहेत.
फोटो : ०२केआरडी०१
कॅप्शन : प्रतीकात्मक