चोवीस तास रंगला विसर्जन सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 12:10 AM2017-09-07T00:10:58+5:302017-09-07T00:11:09+5:30

Twenty-four hours immersion ceremony in color | चोवीस तास रंगला विसर्जन सोहळा

चोवीस तास रंगला विसर्जन सोहळा

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : आसमंत दुमदुमून टाकणारा ढोल-ताशांचा नाद, पारंपरिक वेशभूषेत एकत्र आलेले सातारकर, मिरवणूक पाहण्यासाठी रात्री उशिरापर्यंत जमलेले आबालवृध्द आणि ‘गणपती बाप्पा मोरया.... पुढच्या वर्षी लवकर या’ अशी आर्त हाक देत बाप्पांना निरोप देणाºया भक्तांच्या मांदियाळीत मंगळवारी सकाळी आठ वाजता सुरू झालेला मिरवणुक सोहळा बुधवारी सकाळी आठपर्यंत तब्बल २४ तास रंगला.
शहरातील बहुतांश मंडळांनी सकाळी लवकर गणेशमूर्ती मंडपाबाहेर काढल्या होत्या. त्यामुळे सकाळपासूनच चिमुरड्यांसह भक्तांची गर्दी शहरातील मुख्य रस्त्यांवर सुरू झाली होती. परंपरेने सातारा पालिकेच्या गणपतीची विसर्जन मिरवणूक नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष राजू भोसले, आरोग्य सभापती सविता फाळके, पाणीपुरवठा सभापती सुहास राजेशिर्के, सुजाता राजेमहाडिक, बांधकाम सभापती किशोर शिंदे, सीता हादगे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरू करण्यात आली. त्यानंतर शहरातील अन्य गणेशोत्सव मंडळे या मिरवणुकीत सहभागी झाली.
शहरातील मानाच्या शंकर-पार्वती गणपतीचे विसर्जन बुधवारी सकाळी पाऊणेआठ वाजता झाले. त्यानंतर शहरातील विसर्जन मिरवणुकीची सांगता झाली.
पोलिसांची
सहकुटुंब ड्यूटी
गणेशोत्सव काळात बंदोबस्त असल्यामुळे पोलिसांना सहकुुटुंब हा उत्सव साजरा करता येत नाही. कित्येकदा कुटुंब एका शहरात आणि ड्यूटी दुसºया शहरात अशी परिस्थिती पोलिसांकडे असते. गेल्या काही वर्षांत उत्सव काळात पोलिसांवरील ताण कमी झाला आहे. त्यामुळे संध्याकाळी कुटुंबीयांना विसर्जन मिरवणुकीत बोलावून त्यांच्याबरोबर ‘आॅन ड्युटी’ फिरण्याचा आनंद काही पोलिसांनी घेतला.
खेळण्यांनी याड लावलं
मिरवणुकीत गणपती बाप्पा आणि विविध मंडळांनी आयोजित केलेले खेळ पाहण्यासाठी आणि मुलांनाही ते दाखविण्यासाठी पालकांची धडपड होती. मुलं अंधाराचा आसरा घेऊन बसणाºया विक्रेत्यांकडे आकर्षित होत होती. लाईट लागणारी शिंग, पोंगा, यांच्यासह शिट्या आणि ताशा यांचे आकर्षण मुलांना होते. पालक विसर्जन मिरवणुकीत डोके घालून होते तर मुलं खेळणी बघण्याकडे त्यांना ओढत होते.
महावितरणही सज्ज
गेल्या काही वर्षांत शहरातील मंडळांची संख्या वाढली आहे. वाढत्या संख्येबरोबरच बाप्पांच्या मूर्तीचा आकारही दिवसेंदिवस उंच होत आहे. बाप्पांची उंच मूर्ती कित्येकदा महावितरणच्या वायर तोडत पुढे येते. यामुळे किरकोळ अपघातांचीही संख्या वाढली. उत्सव काळात अपघात टाळण्यासाठी महावितरणचे दत्तात्रय साठे आणि संजय कार्वे यांच्यासह पंचवीस वायरमनवर ही जबाबदारी सोपविण्यात आली होती. विसर्जनासाठी मुख्य रस्त्यावर गणपतीची मूर्ती आली की, परिसरातील विजवाहक तारांचा विद्युत प्रवाह बंद करून मिरवणूकपुढे मार्गस्थ करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. मंगळवारी दुपारी दोन पासून बुधवारी सकाळी आठपर्यंत त्यांनी आपले कर्तव्य बजावले.
खेळाडूंचे नृत्य
सादरीकरण
सातारा येथील शिवाजी उदय मंडळाच्या गणपती विसर्जन मिरवणुकीत छोट्या व मोठ्या खेळाडूंनी अप्रतिम नृत्य सादर करून दरवर्षी प्रमाणे पारंपरिक पद्धतीने मानाची मिरवणूक काढली. यावेळी मंडळाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट पारंपरिक नृत्य सादर केले. चांदीच्या पालखीतून ही मिरवणूक काढण्यात आली होती.

Web Title: Twenty-four hours immersion ceremony in color

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.