चोवीस तासांत दहा हजार कापडी पिशव्या मागणी वाढली : बचत गटांना मिळाला रोजगार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 11:52 PM2018-06-02T23:52:47+5:302018-06-02T23:52:47+5:30
राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यापासून बचत गटांच्या महिलांसह लहान-मोठ्या व्यावसायिकांनी कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे उद्योग वेगाने सुरूकेले आहेत.
प्रशांत कोळी ।
सातारा : राज्य सरकारने प्लास्टिकच्या पिशव्यांवर बंदी घातल्यापासून बचत गटांच्या महिलांसह लहान-मोठ्या व्यावसायिकांनी कागदी व कापडी पिशव्या तयार करण्याचे उद्योग वेगाने सुरूकेले आहेत. दिवसाला तब्बल दहा हजार कापडी पिशव्यांची निर्मिती होत आहे. सातारा जिल्ह्यासह सांगली, कोल्हापूर अन् कोकणातूनही या पिशव्यांना मागणी वाढली आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कैलास शिंदे व जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या निर्देशानुसार आरोग्य विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, आरएसईटी प्रशिक्षण केंद्र आणि आयडीबीआयतर्फे कागदी व कापडी पिशव्यांचे प्रशिक्षण दिले जात आहे. आता नव्या विचारांनी आणि नव्या पद्धतीने स्वत:चे वेगळेपण सिद्ध करण्यासाठी या महिला कापडी पिशव्यांचे विक्रमी उत्पादन करत आहेत. सध्या जिल्ह्यात बचतगटांच्या माध्यमातून तयार होणाऱ्या पिशव्यांच्या किमती आठ रुपयांपासून ते ११० रुपयांपर्यंत आहेत. सातारा शहरासह इतर शहरांमध्येही या पिशव्यांना मागणी वाढली आहे. मागणीनुसार वेगवेगळ्या आकाराच्या आणि नक्षीकाम केलेल्या पिशव्या बचत गट तयार करून देत आहेत.
जिल्ह्यातील सैदापूर, साप, क्षेत्र माहुली, सोनगाव, खेड, लोणंद, म्हसवड, जकातवाडी, करंडी, वडूज, पुसेगाव, खटाव, कातरखटाव, क्षेत्र महाबळेश्वर, मारुल हवेली, पाटण, लिंब गोवे आदी ठिकाणी कागदी व कापडी पिशव्यांची निर्मिती केली जात आहे. एका ठिकाणांहून दररोज पाचशे ते हजार पिशव्या तयार केल्या जात आहे. सांगलीसह मिरज, कोल्हापूर, चिपळूण, इचलकरंजी आदी ठिकाणांहून या पिशव्यांना मोठी मागणी आहे. प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर बचत गटांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.
महाबळेश्वरला दिवसाला दोन हजार मागणी
महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून समजल्या जाणाऱ्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची संंख्या वाढत आहे. दररोज हजारो पर्यटक या ठिकाणी भेटी देत असतात. या ठिकाणी प्लास्टिक पिशव्यांवर बंदी आणल्यापासून महाबळेश्वरमध्ये दररोज दोन हजार कागदी व कापडी पिशव्यांची मागणी होत आहे. यापुढेही संख्याही वाढण्याची शक्यता आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही कापडी व कागदी पिशव्या बनविण्याचे काम करीत आहोत. प्लास्टिक बंदीच्या निर्णयानंतर या उद्योगाला खºया अर्थाने गती मिळाली आहे. सध्या या पिशव्यांना प्रचंड मागणी असून, महिलांसाठी हा रोजगार उत्तम पर्याय ठरणार आहे. - विद्या भोसले, सातारा
महिलांनी पातळ साड्या, कॅनव्हॉस आणि मांजरपाट आदी कपड्यापासून पिशव्या तयार करण्यावर भर दिला आहे.या कापडी पिशव्यातही वेगळेपण जपणाºया खादी पिशव्याही या बचत गटाच्या महिला तयार करत आहेत.
पांढºया शुभ्र खादीच्या पिशव्याही तयार केल्या जात आहेत. सर्वसामान्य पिशव्यांपेक्षा थोडीसी महाग असणारी ही पिशवी पाहताक्षणी पसंत पडते.