VIDEO : भीषण आगीत चोवीस घरे खाक; मध्यरात्री चार सिलेंडरच्या स्फोटानं कराड हादरलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 01:46 PM2022-02-19T13:46:16+5:302022-02-19T13:46:58+5:30
रौद्ररूप धारण केलेल्या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा संपूर्ण परिसर हादरून गेला. वस्तीतील महिलांसह न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जिवितहानी झाली नाही.
कराड- येथील बापूजी साळुंखे पुतळ्याच्या परिसरात असलेल्या वस्तीला शनिवारी पहाटे भीषण आग लागली. रौद्ररूप धारण केलेल्या आगीत चार सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा संपूर्ण परिसर हादरून गेला. वस्तीतील महिलांसह न्यायालयाच्या सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने जिवितहानी झाली नाही. मात्र भयावह आगीत 24 घरे जळून खाक झाली.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, कराड येथे न्यायालयाच्या समोरील बाजूस बापूजी साळुंखे यांचा पुतळा परिसर आहे. या परिसराच्या पाठीमागील बाजूला असलेल्या वस्तीत मध्यरात्री अचानक आग लागली. एका घराला लागलेली ही आग वेगाने वाढत गेली. आग लागल्याने महिलांसह नागरिक आरडाओरडा करत रस्त्यावर आले. त्या महिलांसह आसपासच्या नागरिकांनी आग लागलेल्या घरांशेजारील इतर घरांत झोपलेल्या कुटूंबांना जागे करत बाहेर आणले. तोपर्यंत आग प्रचंड वाढत गेली. आगीच्या भडक्यात चार घरातील सिलेंडरचा स्फोट झाल्याने हा परिसर हादरून गेला.
सातारा : भीषण आगीत चोवीस घरे खाक; मध्यरात्री चार सिलेंडरच्या स्फोटानं कराड हादरलं#fire#firebrigade#karadhttps://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/tWOLIzG0nM
— Lokmat (@lokmat) February 19, 2022
सिलेंडरच्या स्फोटाचा मोठा आवाज झाल्याने शहरात खळबळ उडाली. आग आटोक्यात आणण्यासाठी नागरिकांसह पोलिसांनी प्रयत्न सुरू केले. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत आगीत २४ घरातील साहित्य जळून खाक झाले होते. उपविभागीय.पोलीस अधिकारी रणजीत पाटील, वरिष्ठ पोलीस निरिक्षक बी. आर. पाटील, मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी घटनास्थळी धाव घेतली. अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. या आगीमुळे अनेक संसार उघड्यावर आले आहेत. त्यांची तात्पुरती राहण्याची सोय नगरपरिषद शाळा क्रमांक तीन येथे करण्यात आली आहे.