कोरोनाविरोधातील लढ्यासाठी वीस लाख रुपये!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 03:49 PM2021-04-28T15:49:42+5:302021-04-28T15:55:39+5:30

corona virus Satara : माण तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णसंख्येत भरच पडत आहे. उपचाराअभावी माणची जनता तडफडत असताना जनतेचा जीव वाचविण्यासाठी माण पंचायत समिती सरसावली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून कोरोनाविरोधातील लढ्यासाठी पंचायत समिती सदस्यांनी वीस लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला.

Twenty lakh rupees for the fight against Corona! | कोरोनाविरोधातील लढ्यासाठी वीस लाख रुपये!

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी वीस लाख रुपये!

Next
ठळक मुद्देकोरोनाविरोधातील लढ्यासाठी वीस लाख रुपये! माण पंचायत समिती : अौषधोपचारासोबतच जनजागृतीसाठी खर्चाची तरतूद

दहिवडी : माण तालुक्यात कोरोनाने थैमान घातले असून रुग्णसंख्येत भरच पडत आहे. उपचाराअभावी माणची जनता तडफडत असताना जनतेचा जीव वाचविण्यासाठी माण पंचायत समिती सरसावली आहे. पंधराव्या वित्त आयोगातून कोरोनाविरोधातील लढ्यासाठी पंचायत समिती सदस्यांनी वीस लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला.

माण तालुक्यात दीड हजार कोरोनाबाधित आहेत. तुलनेत आरोग्य सुविधा अपुरी आहे. चार व्हेंटिलेटर, २७ ऑक्सिजन बेड आहेत. कोविड सेंटरमध्ये विलगीकरण बेडची संख्याही अपुरी आहे. त्यामुळे अत्यवस्थ रुग्णांना इतर तालुक्यात, शहरात अथवा जिल्ह्यात भटकावे लागते.

कोरोना सेंटरमध्ये योग्य सुविधा वा जागा उपलब्ध नसल्याने अनेकजण घरीच अलगीकरणात आहेत. अनेक रुग्णांना कोरोनामुक्त होण्यासाठी आवश्यक असलेल्या फॅबिफ्ल्यू या गोळ्या मिळत नाहीत. ऑक्सिजन अभावी कित्येकजण तडफडत आहेत. तालुक्यातील नेतेमंडळी तसेच सामाजिक संस्थांनी कोरोना सेंटरसाठी पुढाकार घेतला आहे. परंतु अजूनही मदतीची आवश्यकता आहे.

ही परिस्थिती लक्षात घेवून पंचायत समितीचे प्रभारी सभापती तानाजी कट्टे-पाटील व सहकारी रमेश पाटोळे, कविता जगदाळे, नितीन राजगे, विजयकुमार मगर, तानाजी काटकर, लतिका विरकर, रंजना जगदाळे, अपर्णा भोसले, चंद्रभागा आटपाडकर यांनी या लढ्याला बळ देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पंचायत समितीच्या पंधराव्या वित्त आयोगातून प्रत्येक सदस्याचे दोन लाख असे वीस लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला.

यावेळी प्रभाकर देशमुख म्हणाले, माणमधील दीड हजार रुग्णांपैकी एक हजार कोरोनाबाधित घरीच उपचार घेत आहेत. त्यांना वैद्यकीय सल्ल्याने फॅबी फ्ल्यू गोळ्या दिल्या तर लवकर बरे होतील.

गटविकास अधिकारी सर्जेराव पाटील यांनी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर यांच्या सल्ल्याने संबंधित रक्कम खर्च करण्याचे सुचित केले. त्यानुसार पहिल्या टप्प्यात ५ लाख रुपये फॅबि फ्ल्यू गोळ्यांसाठी, ५.५ लाख रुपये ऑक्सिजन कॉन्संट्रेटरसाठी, २ लाख रुपये जम्बो सिलेंडरसाठी तर १ लाख रुपये जनजागृतीसाठी वापरण्याचे निश्चित केले. उर्वरित रक्कमही आवश्यक असेल तशी वापरण्याचा निर्णय घेतला.

प्रशासन जनतेसोबत कायम

माणची जनता कोरोनाच्या भयंकर संकटात सापडली आहे. या संकटावर मात करण्यासाठी सर्वांनी प्रशासनाच्या विशेषत: आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे. कोरोनाविरुध्दच्या लढ्यात माण पंचायत समिती जनतेसोबत खंबीरपणे उभी आहे, अशी ग्वाही प्रभारी सभापती तानाजी कट्टे-पाटील यांनी दिली.
 

Web Title: Twenty lakh rupees for the fight against Corona!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.