तब्बल वीस हजार ‘पॉझिटिव्ह’ झाले ‘निगेटिव्ह’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:36 AM2021-05-17T04:36:46+5:302021-05-17T04:36:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना थैमान घालत असतानाच एक दिलासादायक बातमीसमोर आली आहे. गेल्या दहा दिवसांत ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोना थैमान घालत असतानाच एक दिलासादायक बातमीसमोर आली आहे. गेल्या दहा दिवसांत सुमारे वीस हजार रुग्ण कोरोनावर यशस्वी मात करून घरी परतले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रयत्न अन् रुग्णांच्या इच्छाशक्तीपुढे कोराेनाही आता हात टेकू लागला आहे.
कोरोनामुळे अवघा जिल्हा हतबल झाला आहे. दररोज दोन ते अडीच हजार नवे रुग्ण अन् ४५ ते ५० बाधितांचा मृत्यू होत असल्याने चिंतेत वाढ झाली आहे. संचारबंदी असूनही कोरोनाबाधितांची संख्या काही कमी झालेली नाही. मात्र, गेल्या आठ-दिवसांपासून बाधितांची संख्या वाढत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही दिलासादायक आहे.
दि. ६ ते १५ मे या दहा दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील तब्बल १९ हजार ८२९ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहे. दि. १४ मे रोजी कोरोनामुक्तीच्या आकड्याने उच्चांक गाठला. या एकाच दिवसात तब्बल ३ हजार ६६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एप्रिल महिन्यात कोरोनाने अक्षरश: हाहाकार माजविला होता. एकाच महिन्यात कोरोनाचे तब्बल ३७ हजार नवे रुग्ण आढळून आले, तर ५८६ जणांचा मृत्यू झाला. मात्र, मे महिन्यात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढू लागल्याने आरोग्य यंत्रणा व नागरिकांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे.
(चौकट)
आरोग्य सुविधांमध्ये वाढ
कोरोनाबाधितांसाठी बेड तसेच इतर आरोग्य सुविधांची सर्वत्र कमतरता भासू लागली होती. त्यामुळे उपचार वेळेत मिळत नसल्याने रुग्ण दगावण्याचे प्रमाणही अधिक होते. ही विदारक परिस्थिती बदलण्यासाठी आता विविध सामाजिक संस्था, संघटना, लोकप्रतिनिधी व तरुणाई कोरोनाच्या लढ्यात उतरली आहे. अनेकांनी आपल्या गावात बेड तसेच आक्सिजन, रुग्णवाहिका व इतर वैद्यकीय सुविधांची व्यवस्था केली आहे.
(पाॅइंटर)
दहा दिवसांतील स्थिती
दि. कोरोनामुक्त
६ १५९५
७ २०५५
८ १९३६
९ १५१६
१० २५०६
११ १०७२
१२ ८२७
१३ २२८१
१४ ३६६२
१५ २३७९
एकूण १९,८२९
लोगो : पॉझिटिव्ह स्टोरी