वीस वर्षांचा वनवास दहा दिवसांत संपला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:26 AM2021-07-08T04:26:12+5:302021-07-08T04:26:12+5:30
मायणी : मिरज-भिगवण केंद्रीय मार्गातील खटाव-माण तालुक्यांना जोडणाऱ्या मायणी-दहिवडी या सुमारे खटाव तालुक्यातील २५ किलोमीटरचा मार्ग अतिशय खराब झाला ...
मायणी : मिरज-भिगवण केंद्रीय मार्गातील खटाव-माण तालुक्यांना जोडणाऱ्या मायणी-दहिवडी या सुमारे खटाव तालुक्यातील २५ किलोमीटरचा मार्ग अतिशय खराब झाला होता. या मार्गातील १३ किलोमीटर अंतराची दुरुस्ती अवघ्या दहा दिवसांत पूर्ण झाल्याने वीस वर्षांचा वनवास दहा दिवसांत संपला असून, उर्वरित बारा किलोमीटरचा मार्ग लवकर पूर्ण करावा, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक ग्रामस्थांकडून होत आहे.
सातारा, सांगली, पुणे व अहमदनगर जिल्ह्यांतून उत्तर व दक्षिण भारतात जाणारा प्रमुख मार्ग म्हणून केंद्राने गेल्या तीन वर्षांपूर्वी स्वतःकडे हा मार्ग वर्ग करून घेतला. तत्पूर्वी मिरज-भिगवण हा मार्ग राज्यमार्ग क्रमांक दहा असा होत. या राज्यमार्गावर सांगली जिल्ह्यासह पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक वर्षी दुरुस्तीसाठी मोठा निधी उपलब्ध होत होता. त्यामुळे या भागामध्ये या रस्त्याचा दर्जा अतिशय चांगला होता.
मात्र सातारा जिल्ह्यातील खटाव, माण व फलटण तालुक्यांना जोडणाऱ्या या मार्गावर वीस वर्षांपासून फक्त खाद्य भरण्याचे काम केले जात होते. खड्डे भरण्यासाठी प्रत्येक वर्षी लाखो रुपये खर्च करून रस्ता दुरुस्त केला, असा कांगावा संबंधित विभाग करत होते. मात्र खड्डे भरल्यानंतर पुन्हा दहा ते पंधरा दिवसांत हे खड्डे स्वतःचे अस्तित्व दाखवण्यास सुरुवात करत होते.
गत तीन वर्षांपासून जिल्ह्यातील संबंधित विभाग हा मार्ग केंद्राकडे वर्ग केला आहे. त्यामुळे आम्हाला निधी टाका येत नाही, असे सांगून हात वर करत होते. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या लोकांना मोठी कसरत करावी लागत होती. रस्त्यावर एक फुटापेक्षा अधिक खोलीचे खड्डे पडल्याने आर्थिक व शारीरिक नुकसान होते.
गत महिन्यात २२ जूनपासून खटाव तालुक्यातील सुमारे २५ किलोमीटर अंतराचे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. या २५ किलोमीटरमधील खटाव तालुक्याची हद्द ते तडवळे, बोंबाळे, कातरखटाव, बनपुरीपर्यंतचा सुमारे १३ किलोमीटरचा मार्ग संबंधित विभागाने अवघ्या दहा दिवसांत पूर्ण केला. त्यामुळे या मार्गाचा वीस वर्षांचा वनवास अवघ्या दहा दिवसांत संपला.
(चौकट)
मायणी ते सांगली जिल्हा हद्दीपर्यंत रस्ता दुरुस्तीच्या प्रतीक्षेत..
याच मार्गावरील सूर्याचीवाडी, धोंडेवाडी, मायणी ते सांगली जिल्हा हद्दीपर्यंत म्हणजे उर्वरित सुमारे १२ किलोमीटरच्या मार्ग आजही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे. या मार्गावर मोठमोठे खड्डे असल्याने या अंतरामध्ये सतत लहान-मोठे अपघात घडत आहेत. त्यामुळे हा मार्ग लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी वाहनचालक व स्थानिक ग्रामस्थ करत आहे.
०७मायणी
मिरज-भिगवण मार्गावरील सातारा-सांगली जिल्ह्याच्या हद्दीवर पडलेल्या खड्ड्यांमुळे सतत अपघात होत आहेत. (छाया : संदीप कुंभार)