पंधरा दिवसांत दोनवेळा कळसूबाई शिखर सर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:46 AM2021-02-17T04:46:03+5:302021-02-17T04:46:03+5:30
सणबूर : कुठरे, ता. पाटण येथील डॉ. संदीप सुभाष भिंगारदेवे यांनी गत पंधरा दिवसांत दोनवेळा राज्यातील सर्वांत उंच कळसूबाई ...
सणबूर : कुठरे, ता. पाटण येथील डॉ. संदीप सुभाष भिंगारदेवे यांनी गत पंधरा दिवसांत दोनवेळा राज्यातील सर्वांत उंच कळसूबाई शिखर सर केले.
सखा सह्याद्री ग्रुपमार्फत डॉ. संदीप भिंगारदेवे यांनी प्रथम कळसुबाई शिखर सर केले. त्यावेळी शिखरावर जिल्ह्यातील शहीद जवानांना त्यांनी श्रद्धांजली वाहिली तसेच तिरंगा फडकावून राष्ट्रगीत म्हटले. २४ जानेवारीच्या या मोहिमेत ९ वर्ष ते ६३ वर्ष वयाचे ट्रेकर्स सहभागी होते. त्यानंतर ३१ जानेवारीला डॉ. संदीप भिंगारदेवे हे सहकुटुंब किल्ले रायगडला गेले होते. जाताना ते रोपवेद्वारे गडावर गेले. मात्र, रायगड उतरताना दहा वर्षांची मुलगी संस्कृती व तीन वर्षांचा मुलगा अमेय या दोन्ही मुलांना आपल्या खांद्यावर घेऊन त्यांनी पायी गड उतरला. ७ फेब्रुवारीला पुन्हा त्यांनी कळसूबाई शिखर सर केले. यावेळी ९० मिनिटांचा कालावधी ठरवून त्यांनी चालण्यास सुरुवात केली. मात्र, ते अंतर ११० मिनिटांत त्यांनी पार केले. सरासरी हे अंतर चालायला साडेतीन ते चार तास एवढा कालावधी लागतो.
डॉ. भिंगारदेवे हे मूळचे कुठरे गावचे असले तरी व्यवसायानिमित्त ते अपशिंगे येथे राहतात. त्याठिकाणी मित्रांचा ट्रेकिंग ग्रुप आहे. दररोज ८ ते १० किलोमीटर चालणे, डोंगर चढाई करणे, प्रत्येक १५ दिवसाला साताऱ्यातील बोगदा ते सज्जनगड हे १५ किलोमीटर अंतर ते चालत जातात. या उपक्रमात महिला, युवक, युवती, वृद्धांचाही सहभाग असतो.
- चौकट
अनेक गडांसह डोंगरांवर चढाई
आजवर या ग्रुपने डोंगर, टेकड्या आणि गडकिल्ले सर केले आहेत. त्यामध्ये प्रतापगड, पन्हाळा, जीवधनगड, चावंडगड, हडसर गड, मल्हारगड, प्रचंडगड, महिमानगड, भूषणगड, कल्याणगड, सिंधुदुर्ग, पाटेश्वर डोंगर, जरंडेश्वर डोंगर, वसंतगड, वैराटगड, रायगड, अजिंक्यतारा, येवतेश्वर, सज्जनगड, चंदन वंदन, सुळपाणी डोंगर, जानाई मळाई डोंगर, पिराचा डोंगर, आबापुरी डोंगर, इंजाबाई डोंगर, नागेश्वर डोंगर आणि वासोटा किल्ला आदीचा समावेश आहे.
फोटो : १६केआरडी०२
कॅप्शन : कुठरे (ता. पाटण) येथील डॉ. संदीप भिंगारदेवे यांच्यासह त्यांच्या ग्रुपने कळसूबाई शिखर सर करून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.