अडीच वर्षांचं ऑनलाईन नेतृत्व शेतकऱ्यांच्या बांधावर, शंभूराज देसाईंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
By नितीन काळेल | Published: September 8, 2023 07:31 PM2023-09-08T19:31:59+5:302023-09-08T19:33:35+5:30
रोहित पवारांना म्हणाले आपलं फाटलेलं आभाळ पाहावं..
सातारा : अडीच वर्षे ऑनलाईन नेतृत्व केले. शेतकऱ्यांच्या बांधावर कधी गेले नाहीत. असे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे दुष्काळ पाहणी दाैरा करत आहेत. त्यांच्याकडून चांगले काम करणाऱ्या शासनाला बदनाम करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरु आहे, असा हल्लाबोल पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केला. तर आमदार रोहित पवार यांना आपलं आभाळ फाटलं आहे ते पहावं, असेच एकप्रकारे सुनावले.
येथील शासकीय विश्रामागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री देसाई बोलत होते. ते पुढे म्हणाले, ‘राज्य शासन दुष्काळाबाबत संवेदनशील आहे. आताच्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे याबाबत कॅबिनेटमध्येही चर्चा झाली आहे. पण, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे नगर जिल्ह्यात दुष्काळ पाहणी दाैऱ्यावर आहेत. तेथे त्यांनी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, पाहणीही करावी याबाबत आमचे दुमत नाही. मात्र, सतत ‘शासन आपल्या दारी’वर टीका करत आहेत. हा चांगला उपक्रम असून दीड कोटी लाभार्थ्यांना याचा फायदा झाला आहे.
पण, अडीच वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांना जिल्ह्यांचे दाैरे करण्याचा आग्रह आम्ही करत होतो. त्यावेळी त्यांनी कोरोना, लाॅकडाऊनचे कारण दिले. आमची विनंती कधीही मान्य केली नाही. अडीच वर्षे आॅनलाईन नेतृत्व करणारे कधीही शेतकऱ्यांच्या बांधावर गेले नाहीत. त्यांना आताच्या शासनाचं काम पाहवत नाही हे दुर्दैव आहे. त्यांनी अजुनही टीका केली तरी आमचे चांगले काम सुरूच राहील.
आमचे सरकार नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे, असे सांगून पालकमंत्री देसाई पुढे म्हणाले, ‘नियमीत पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. उध्दव ठाकरे यांनी अनुदान दिले नाही. पण, मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आल्यानंतर शेतकऱ्यांना साडे चार हजार कोटींहून अधिक रुपयांचे प्रोत्साहन अनुदान दिले. अतिवृष्टीत पिकांचे नुकसान झाल्यानंतर ठाकरे यांनी केंद्र शासन आणि एनडीआरएफच्या निकषांकडे बोट दाखवले. पण, आम्ही निकष बदलून शेतकऱ्यांना मदत केली. कांदा प्रश्नावर शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले.
यावेळी पालकमंत्री देसाई यांना मराठा समाज आरक्षणाचा प्रश्न केल्यावर त्यांनी इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा सामाजाला आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरु आहे. हे सरकार संवेदनशील आहे. मुख्यमंत्री शिंदे हेच आरक्षण देतील असे स्पष्ट केले. तर मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर भंडारा टाकल्याच्या प्रश्नावर त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन जरुर करावे, निवेदन द्यावे. पण, अंगावर भंडारा फेकण्याची पध्दत योग्य नाही, असे बोलून झाल्याप्रकाराबाबत नाराजी व्यक्त केली.
‘त्यांनी’ पाहुण्यासारखं यावं..
माण तालुक्यातील दहिवडी येथे राष्ट्रवादीचा मेळावा झाला होता. त्यावेळी आमदार रोहित पवार यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दुष्काळी पाहणी दाैरा केला नसल्याची टीका केली होती. या अनुषंगाने पत्रकारांनी प्रश्न केल्यावर मंत्री देसाई यांनी ‘रोहित पवार यांनी जिल्ह्यात पाहुण्यासारखं यावं. पण, त्यांनी आपलं फाटलेलं आभाळ पहावं, असे निक्षून सांगितले. यावरुन देसाई यांचा रोख राष्ट्रवादीत दुसरा गट केलेल्या अजित पवार यांच्याकडेच असल्याची चर्चाही सुरु झाली.