अडीच कोटी दंड; ४७ हजार वाहनांवर कारवाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:36 AM2021-02-12T04:36:39+5:302021-02-12T04:36:39+5:30

मलकापूर : वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी कऱ्हाडच्या महामार्ग पोलिसांनी आधुनिक ‘इंटरसेप्टर व्हॅन’चा वापर सुरू केला आहे. वर्षभरात महामार्गावरील ...

Two and a half crore fine; Action on 47,000 vehicles! | अडीच कोटी दंड; ४७ हजार वाहनांवर कारवाई!

अडीच कोटी दंड; ४७ हजार वाहनांवर कारवाई!

Next

मलकापूर : वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी कऱ्हाडच्या महामार्ग पोलिसांनी आधुनिक ‘इंटरसेप्टर व्हॅन’चा वापर सुरू केला आहे. वर्षभरात महामार्गावरील तब्बल ४७ हजार ६०३ वाहनांवर विविध कलमांखाली पोलिसांनी दंडात्मक कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे २ कोटी ५५ लाख ३४ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दरम्यान, महामार्ग पोलिसांनी कारवाई केलेल्या एकूण वाहनांपैकी २० हजार ६६८ वाहनांवर वेग मर्यादेचे उल्लंघन केल्याप्रकरणी कारवाई झाली आहे. वेगमर्यादा ओलांडणाऱ्या वाहनधारकांकडून तब्बल १ कोटी ९४ लाख ९२ हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

महामार्गावर सध्या अती वेगामुळे होणाऱ्या अपघातांची संख्या वाढली असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. जानेवारी महिन्यातील शेवटच्या रविवारी नारायणवाडी गावच्या हद्दीत झालेल्या अपघातात तीन ठार तर आठजण जखमी झाले होते. त्यानंतर आठच दिवसात रविवारी पुन्हा वहागावजवळ भरधाव वेगातील कारच्या अपघातात चार ठार तर एक गंभीर जखमी झाला होता. मुंढे येथील युवतीला महामार्ग ओलांडताना भरधाव कारने धडक दिली. कंटेनरने सुपनेच्या युवकाचा बळी घेतला. कोल्हापूर नाक्यावर ट्रकने दाम्पत्याला चिरडले. हे सर्व अपघात वाहनांच्या अतिवेगामुळे झाल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट झाले आहे.

पुणे-बंगळूर महामार्गावर अपघाताचे प्रमाण वाढल्याचे निदर्शनास आल्याने पोलिसांनी कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. लेन कटींग, सिटबेल्ट न लावणाऱ्या, हेल्मेट नसणाऱ्या त्याचबरोबर इतर वाहतुकीचे नियम न पाळणाऱ्यांवरही महामार्ग पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. एका वर्षात ४७ हजार ६०३ वाहनांवर विविध कलमाखाली दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

- चौकट

महिन्यात नऊ हजार वाहनांवर कारवाई

जानेवारीतही महामार्ग पोलिसांनी कारवाईची मोहीम कायम ठेवली. एका महिन्यात एकूण ९ हजार ६९४ वाहनांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून ४० लाख ५२ हजार ८०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असून. यामध्ये अतिवेगात असणाऱ्या १ हजार १७६ वाहनांचा समावेश आहे. संबंधित वाहनधारकांना ११ लाख ७६ हजारांचा दंड करण्यात आला आहे.

- कोट

महामार्गालगतचे हॉटेल, ढाबे, टोलनाके अशा ठिकाणी रात्रीच्यावेळी सुरक्षित वाहन पार्क करून रिफ्लेक्टर लावावे. मद्यपान करून, विरूध्द दिशेने, बेशिस्त व भरधाव वेगात वाहन चालवू नये. सुरक्षित अंतर ठेवावे. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करावा. वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई केली जाईल.

- अस्मिता पाटील,

सहाय्यक पोलीस निरीक्षक

फोटो : ११केआरडी०१

कॅप्शन : वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी कऱ्हाडच्या महामार्ग पोलिसांकडून इंटरसेप्टर व्हॅनचा वापर केला जातो.

Web Title: Two and a half crore fine; Action on 47,000 vehicles!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.