गुंड दत्ता जाधवची अडीच कि.मी. वरात सांगली पोलिसांवरील हल्लाप्रकरणात अटक- दोनशे पोलिसांचा ताफा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2018 11:19 PM2018-05-04T23:19:14+5:302018-05-04T23:19:14+5:30
सातारा : सांगली पोलिसांच्या पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंड दत्ता जाधवला अखेर शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. तब्बल अडीच किलोमीटर चालत भर रस्त्यातून त्याची पोलीस ठाण्यापर्यंत वरात
सातारा : सांगली पोलिसांच्या पथकावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या गुंड दत्ता जाधवला अखेर शुक्रवारी रात्री साडेसातच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. तब्बल अडीच किलोमीटर चालत भर रस्त्यातून त्याची पोलीस ठाण्यापर्यंत वरात काढण्यात आली. दत्ता जाधवला पकडण्यासाठी दोनशे पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, जत तालुक्यातील प्रतापपूर येथे २५ एप्रिल रोजी पीर उरूसामध्ये गुंड दत्ता जाधव हा त्याच्या साथीदारांसमवेत येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सांगली आणि सातारा पोलिसांनी दत्ता जाधवला पकडण्यासाठी सापळा रचला.
त्यावेळी दत्ता जाधव आणि त्याच्या साथीदारांनी उलट पोलिसांवरच हल्ला केला. एवढेच नव्हे तर पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करून पोलिसांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर दत्ता जाधवने तेथून पलायन केले होते. याप्रकरणी त्याच्यावर व साथीदारांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल झाला होता.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून दत्ता जाधवचा पोलीस शोध घेत होते. विविध ठिकाणी पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी पथके तैनात केली होती. मात्र, तो सापडत नव्हता. शुक्रवारी दुपारी तो साताºयात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. प्रतापसिंहनगरमधील घरात तो असल्याचे समजल्यानंतर तब्बल दोनशे पोलिसांचा ताफा अचानक त्या ठिकाणी पोहोचला. इतर नागरिकांना काही कळायच्या आत दत्ता जाधवला पोलिसांनी अटक केली.
गेल्या कित्येक वर्षांपासून दत्ता जाधवची सुरू असलेली दहशत मोडीत निघावी म्हणून पोलिसांनी त्याला भर रस्त्यातून चालवत शहर पोलीस ठाण्यात आणले. अडीच किलोमीटर चालवत त्याची वरात काढण्यात आली. रस्त्यावरून ये-जा करणारे नागरिक काही क्षण जागच्या जागी थांबून दत्ता जाधवची वरात पाहात होते. त्याला अटक झाल्याचे समजताच त्याच्या समर्थकांनी शहर पोलीस ठाण्यासमोर प्रचंड गर्दी केली होती. या ठिकाणी त्याची चौकशी पूर्ण झाल्यानंतर त्याला जत पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्याचे साथीदार दीपक अण्णा लोंढे, धनराज ऊर्फ धनू ज्ञानदेव बडेकर (दोघेही रा. प्रतापसिंहनगर, सातारा) या दोघांना बुधवारी रात्री स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली होती.
प्रतापसिंहनगरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त
गुंड दत्ता जाधवला अटक झाल्यानंतर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांनी प्रतापसिंहनगरमध्ये रात्री उशिरापर्यंत कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. जलद कृतीदलाची तुकडीही परिसरात गस्त घालत होती.
गुंड दत्ता जाधवला शुक्रवारी रात्री प्रतापसिंहनगरमध्ये अटक केल्यानंतर त्याला अडीच किलोमीटर चालवत पोलीस ठाण्यात आणण्यात आले.