अडीच वर्षांच्या बालकाचा ‘स्वाइन फ्लू’मुळे मृत्यू
By admin | Published: September 10, 2015 12:42 AM2015-09-10T00:42:34+5:302015-09-10T00:42:52+5:30
मृत्यू पावलेल्यांची संख्या जिल्ह्यात आता सहा
सातारा : स्वाइन फ्लूच्या साथीने मृत्युमुखी पडलेल्यांच्या संख्येत आणखी एकाची भर पडली असून, पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या अडीच वर्षांच्या बालकाचा या आजाराने मंगळवारी दुपारी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
अबूझर साबीर शेख (रा. शनिवार पेठ, सातारा) असे मृत्युमुखी पडलेल्या दुर्दैवी बालकाचे नाव आहे. त्याला स्वाइन फ्लूची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दि. ३ सप्टेंबरपासून पुण्याच्या केईएम रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. तेथेच मंगळवारी (दि. ८) दुपारी १२ वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.
दरम्यान, स्वाइन फ्लूमुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या जिल्ह्यात आता सहा झाली आहे. दोन बाधित रुग्णांवर उपचार सुरू असून, सहा संशयितांना उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. संशयितांच्या रक्ततपासणीनंतरच त्यांना या आजाराची लागण झाली आहे की नाही, याचा उलगडा होईल. (प्रतिनिधी)