Satara: तीस ठिकाणचे सीसीटीव्ही पाहिले; मग, चोरटे निष्पन्न केले; वसुली अधिकाऱ्यास लुटणाऱ्या दोघांना अटक
By नितीन काळेल | Published: July 14, 2023 07:14 PM2023-07-14T19:14:14+5:302023-07-14T19:15:25+5:30
भुईंज पोलिसांची कारवाई : संशयित दोघेही सोलापूर जिल्ह्यातील
सातारा : खासगी कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याला दुचाकी आडवी मारुन लुटणाऱ्या सोलापूर जिल्ह्यातील दोघांना भुईंज पोलिसांनी अटक केली. यासाठी पोलिसांनी ते ज्या मार्गावरुन गेले तेथील ३० ते ३५ ठिकाणच्या सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले. त्यानंतर संबंधितांना पकडले.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दि. ४ जुलै रोजी वाई तालुक्यातील केंजळ गावच्या हद्दीत दुचाकीवरील अनोळखी दोघांनी गाडी आडवी मारुन खासगी कंपनीच्या वसुली अधिकाऱ्याला लुटले होते. तसेच त्यांच्याजवळील १ लाख ५० हजार रुपयांची रोखड, कंपनीचे पावती पुस्तक, आधारकार्ड, पॅनकार्ड आदींसह इतर कागदपत्रे जबरदस्तीने नेली होती. याप्रकरणी भुईंज पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला होता.
गुन्हा दाखल झाल्यानंतर वाईचे पोलिस उपअधीक्षक बाळासाहेब भालचिम यांनी भुईज पोलिसांना तपासाची सूचना केली. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा केल्यानंतर चोरटे ज्या मार्गाने गेले. त्या रस्त्यावरील ३० ते ३५ ठिकाणच्या सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. चोरट्यांनी गुन्ह्यात वापरलेली दुचाकी निष्पन्न केली. तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे दोघे चोरटे हे सोलापूर जिल्ह्यातील धर्मपूरी (ता. माळशिरस) येथील असल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर पोलिस पथकाला पाठवून दोघांनाही ताब्यात घेण्यात आले. अजय मोहन पाटोळे आणि दीपक नाना जाधव (दोघेही रा. धर्मपुरी) अशी त्यांची नावे आहेत.
या कारवाईत भुईंज ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रमेश गर्जे, उपनिरीक्षक भंडारे, उमाप, हवालदार नितीन जाधव, रवीराज वर्णेकर, सोमनाथ बल्लाळ, सागर मोहिते, किरण निंबाळकर आदी कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.