सांबराच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक
By दत्ता यादव | Published: January 21, 2024 08:16 PM2024-01-21T20:16:52+5:302024-01-21T20:18:11+5:30
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; पाच लाखांचा मुद्देमाल जप्त
दत्ता यादव/ सातारा: संरक्षित वन्यप्राणी असलेल्या सांबराच्या शिंगाची तस्करी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून सांबराची दोन मोठी शिंगे हस्तगत करण्यात आली आहेत. ही कारवाई शनिवार, दि. २० रोजी सायंकाळी करण्यात आली.
नितीन आत्माराम जाधव (वय ३२, रा. गोसावीवाडी, ता. कऱ्हाड), अमोल सुरेश गायकवाड (वय ३८, रा. गायकवाड वाडी, ता. कऱ्हाड), अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची संशयितांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कऱ्हाड तालुक्यातील पेरले गावच्या हद्दीतील पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सेवा रस्त्यावर दोन तरुण सांबर या वन्यप्राण्याच्या शिंगाची तस्करी व विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तातडीने आपल्या पथकाला त्या ठिकाणी कारवाईसाठी पाठवले.
पथकातील पोलिसांनी साध्या वेशात त्या ठिकाणी सापळा लावला. त्यावेळी दुचाकीवरून दोन तरुण आले. त्यांच्याजवळ असलेल्या पोत्यामध्ये पोलिसांनी झडती घेतली असता त्यामध्ये सांबर या वन्यप्राण्याची दोन मोठी शिंगे आढळून आली. ही शिंगे पोलिसांनी हस्तगत केली. तस्करी करण्यासाठी वापरण्यात आलेल्या दुचाकीसह ५ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केला. नितीन जाधव आणि अमोल गायकवाड या दोघांवर उंब्रज पोलिस ठाण्यात वन्यप्राणी अधिनियम १९७२ या कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिस अधीक्षक समीर शेख, अपर पोलिस अधीक्षक आंचल दलाल, पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक रवींद्र भोरे, रोहित फार्णे, पोलिस उपनिरीक्षक विश्वास शिंगाडे, फाैजदार सुधीरबनकर, हवालदार साबीर मुल्ला, सचिन झेंडे, अमृत कर्पे, शिवाजी भिसे, केतन शिंदे, धीरज महाडिक, पृथ्वीराज जाधव, मोहसीन मोमीन, स्वप्नील दाैंड यांनी ही कारवाई केली.
सांबराची शिकार कोठे केली?
सांबराची शिंगे संशयितांनी नेमकी कोठून आणली व ती कोणाला विकण्यासाठी जात होते, याबाबत पोलिस त्यांच्याकडे कसून चाैकशी करत आहेत. सांबराची शिकार कोणत्या भागात करण्यात आली, हे सुद्धा तपासाअंती समोर येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.