Satara: अनाथाश्रम चालविणाऱ्या महिलेसह दोघांना अटक, देहव्यापाराला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2024 12:27 PM2024-08-22T12:27:48+5:302024-08-22T12:28:06+5:30

कऱ्हाड : देहव्यापार करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका अनाथाश्रम चालक महिलेसह दोघांविरोधात कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला ...

Two arrested including woman who runs orphanage, case registered for abetting prostitution in Satara | Satara: अनाथाश्रम चालविणाऱ्या महिलेसह दोघांना अटक, देहव्यापाराला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

Satara: अनाथाश्रम चालविणाऱ्या महिलेसह दोघांना अटक, देहव्यापाराला प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

कऱ्हाड : देहव्यापार करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी एका अनाथाश्रम चालक महिलेसह दोघांविरोधात कऱ्हाड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली असून, त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर केले असता २३ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली.

वाल्मीक महादेव माने (रा. म्हासोली, ता. कऱ्हाड) याच्यासह आश्रम चालविणाऱ्या महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, एका महिलेस जबरदस्तीने परपुरूषांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याबाबतची माहिती पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर व पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांना मिळाली होती. तसेच लोणंद परिसरातील संबंधित महिला सातारा येथे आल्याचे समजल्यानंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे एक पथक साताऱ्याला रवाना झाले. संबंधित महिलेस ग्रामीण पोलिसांनी कऱ्हाडला आणल्यानंतर तिच्या सांगण्यावरुन तक्रार दाखल करण्यात आली.

पीडित महिलेची एक वर्षापूर्वी कऱ्हाड तालुक्यातील टेंभू येथे अनाथाश्रम चालविणाऱ्या महिलेशी ओळख झाली होती. त्यानंतर संशयित महिलेने पीडित महिलेला पुरुषांशी शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडत देहव्यापार करण्यास प्रवृत्त केले. तसेच तिने आर्थिक प्राप्ती केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. याकामी संशयित महिलेस वाल्मीक महादेव माने हा मदत करत होता. तसेच त्यानेही पीडित महिलेवर अत्याचार केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोेलिसांनी दोन्ही संशयितांना अटक केली आहे. तसेच याप्रकरणी आणखी काही संशयितांचा सहभाग आहे का, याबाबतचा तपास सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी दिली.

आश्रमात कोणी राहत नसल्याची माहिती

टेंभू परिसरातील अनाथ आश्रमाच्या नावावर महिलांना ठेवून देहविक्री करण्यास भाग पाडत लोकांकडून पैसे स्वीकारले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस उपअधीक्षक अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यानंतर एक वृद्ध महिला तिच्या नातीसह दहा वर्षांपासून तेथे राहत असल्याचे समोर आले आहे. तसेच त्याठिकाणी इतर कोणीही महिला, मुली राहत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी वृद्ध महिलेसह तिच्या नातीला शासकीय संस्थेत पाठविले आहे.

Web Title: Two arrested including woman who runs orphanage, case registered for abetting prostitution in Satara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.