वृद्धाला लुटणाऱ्या दोघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:27 AM2021-07-02T04:27:07+5:302021-07-02T04:27:07+5:30
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फोडजाई देवी मंदिराजवळ पायी चाललेल्या ज्येष्ठ नागरिकाला धक्का देऊन त्याच्याकडील मोबाईल व घड्याळ जबरदस्तीने ...
सातारा : जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील फोडजाई देवी मंदिराजवळ पायी चाललेल्या ज्येष्ठ नागरिकाला धक्का देऊन त्याच्याकडील मोबाईल व घड्याळ जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली.
अतिक्रमण मुंजेश ऊर्फ विज्या काळे (रा. रेवडी, ता. कोरेगाव), नकुल छगन काळे (रा. रहिमतपूर, ता. कोरेगाव) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ठाकोरभाई गणपतराव शहा (वय ८४, रा. फोंडजाई मंदिराशेजारी पोवइ नाका, सातारा) हे शनिवारी (ता. २६) रात्री जेवणानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर पडले होते. यावेळी दोघांनी त्यांच्याकडील मोबाइल आणि घड्याळ जबरदस्तीने चोरून नेले होते. या प्रकारानंतर पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी आरोपींना तत्काळ पकडण्याचा सूचना दिल्या. त्यानुसार एलसीबीचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. या पथकाच्या चौकशीत संशयित हे कोरेगाव तालुक्यातील रेवडी येथील असल्याचे समोर आले. त्यानुसार पथकाने त्यांना रेवडी येथून अटक केली. जेष्ठ नागरिकाच्या गुन्ह्याबरोबरच अटक केलेल्या दोघांकडून सैनिक स्कूल व आंबेघर (ता. मेढा) येथील चंदनचोरीचे गुन्हेही उघडकीस आले आहेत. त्यांच्यासोबत अधिक्षक ऊर्फ अध्यक्ष पितांबर शिंदे (रा. चिंचणेर वंदन, ता. सातारा) या संशयिताला अटक करण्यात आली. तो सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाललैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलिसांना हवा होता. त्याला तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव व एलसीबीचे कर्मचारी सहभागी होते.