सातारा जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री निश्चित; शिंदेसेनेचे ठरलं, भाजपमध्ये स्पर्धा, राष्ट्रवादीचे पत्ते बंद
By नितीन काळेल | Updated: December 5, 2024 13:51 IST2024-12-05T13:50:35+5:302024-12-05T13:51:38+5:30
.. तर दुष्काळी भागाला पहिल्यांदा मंत्रिपद

सातारा जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री निश्चित; शिंदेसेनेचे ठरलं, भाजपमध्ये स्पर्धा, राष्ट्रवादीचे पत्ते बंद
नितीन काळेल
सातारा : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर १२ दिवसांनी गुरुवारी मंत्रिमंडळ स्थापन होत असून, यामध्ये सातारा जिल्ह्याचाही नंबर लागणार आहे. यामध्ये किमान दाेघांचा कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश होऊ शकतो. शिंदेसेनेकडून शंभूराज देसाई यांचे नाव निश्चित असून, भाजपमधून आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि जयकुमार गोरे यांच्यात स्पर्धा आहे, तर राष्ट्रवादीचे पत्ते अजूनही पूर्णपणे उघड झालेले नाहीत.
विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. सातारा जिल्ह्यातही महाविकास आघाडीचा धुरळा उडवताना महायुतीने सर्वच आठही मतदारसंघात झेंडा फडकवला. त्यामुळे जिल्ह्यात भाजपचे सर्वाधिक चार, तर शिंदेसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रत्येकी दोन आमदार आहेत. निवडणुकीनंतर १२ दिवसांनी गुरुवारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होणार आहे. तसेच मंत्रिमंडळाचीही स्थापना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातीलही इच्छुकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर सावलीसारखे उभे राहणारे पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांना यावेळीही मंत्रिपदाची संधी आहे. त्यांचे कॅबिनेट मंत्रिपद निश्चित मानले जाते. पण, भाजपमध्ये सातारचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि माणचे जयकुमार गोरे यांच्यात मंत्रिपदावरून चुरस आहे. तरीही शिवेंद्रसिंहराजेंचेच पारडे जड वाटत आहे. सातारा - जावळीत स्वत:चा हुकमी गट तसेच त्यांच्यासाठी खासदार उदयनराजे भोसले यांनीही गाठीभेटी घेतल्या आहेत. असे असले तरीही कामाची पध्दत, जिल्ह्यातील गट, पक्षासाठी होणार फायदा याचा विचार केल्यास जयकुमार गोरेंना मंत्रिपदाचे दार उघडे होऊ शकते. शिवेंद्रसिंहराजेंना मंत्रिपद मिळाले तर त्यांना पक्षवाढीसाठी जिल्ह्यात वावर वाढवावा लागणार आहे. त्यामुळे भाजप नेतृत्व दोघांपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार हे मंत्रिमंडळ स्थापनेवेळीच समोर येणार आहे.
मकरंद पाटील यांच्या मंत्रिपदाबाबत अनिश्चितता..
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजूनही सर्व गुपचूप आहे. सर्व पत्ते ओपन झालेले नाहीत. त्यातच पक्षाच्या वाट्याला ८ ते १० मंत्रिपदे येणार आहेत. त्यामुळे कोणाकोणाला मंत्री करायचे, असा प्रश्न माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर आहे. विभागांचा विचार करून आणि मातब्बरांना मंत्रिपदावर ठेवूनच त्यांना निर्णय घ्यावा लागणार आहे. त्यामुळे वाईचे आमदार मकरंद पाटील राष्ट्रवादीकडून दावेदार असलेतरी मंत्रिपदाबाबत अनिश्चितता आहे. तरीही अजित पवार यांच्याबरोबरचे संबंध पाहता मकरंद पाटील यांनाही लाॅटरी लागू शकते. पण, हा जर-तरचा राजकीय खेळ राहणार आहे.
.. तर दुष्काळी भागाला पहिल्यांदा मंत्रिपद
जिल्ह्यात सध्या आठ मतदारसंघ आहेत. यामधील सातारा, वाई, फलटण, कऱ्हाड दक्षिण आणि उत्तर, पाटण या मतदारसंघातील आमदारांना आतापर्यंत मंत्रिपद कधी ना कधी मिळालेले आहे. पण, माण मतदारसंघाला मंत्रिपदाची हुलकावणीच राहिलेली आहे. जयकुमार गोरे यांचे भाजपमधील अनेक राजकीय नेत्यांशी जवळचे संबंध आहेत. त्यामुळे याचा फायदा जयकुमार यांना होऊ शकतो. जयकुमार यांना लाल दिवा मिळाल्यास दुष्काळी भागाला प्रथमच मंत्रिपद मिळणार आहे.
पित्यानंतर पुत्र मंत्री होणार ?
सातारा विधानसभा मतदारसंघाचे नेतृत्व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे करत आहेत. शिवेंद्रसिंहराजेंचे वडील अभयसिंहराजे भोसले यांनीही अनेक वर्षे मतदारसंघाचे एकहाती नेतृत्व केले. अभयसिंहराजे हे सहकारमंत्रीही होते. आता शिवेंद्रसिंहराजेंना मंत्रिमंडळात स्थान मिळाल्यास पित्यानंतर पुत्रही मंत्री होणार आहे.