सातारा जिल्ह्यात दोन ‘केबल स्टे ब्रिज’ उभारण्यात येणार, पर्यटन वाढीस चालना मिळणार
By सचिन काकडे | Published: August 10, 2023 06:09 PM2023-08-10T18:09:03+5:302023-08-10T18:10:17+5:30
२५ किलोमीटर अंतराचा प्रवासही वाचणार
सातारा : बामणोली, तापोळा भागात पर्यटन वाढीसाठी महत्त्वाच्या ठरणाऱ्या बामणोली-दरे आणि आपटी-तापोळादरम्यान सी लिंक पद्धतीचे दोन ‘केबल स्टे ब्रिज’ उभारण्यात येत आहेत. या पुलामुळे आपटी, वाकी, तेटली, बामणोली आदी गावांना फायदा होणार असून, २५ किलोमीटर अंतराचा प्रवासही वाचणार आहे, अशी माहिती आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.
सातारा येथे गुरुवारी आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला जावळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता डी. एस. पवार, शाखा अभियंता नीलेश कोहाळे, महेश कुन्हाळीकर, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यासह बामणोली भागातील ग्रामस्थ उपस्थित होते.
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, ‘बामणोली ते दरे असा ७२० मीटरचा ‘केबल स्टे ब्रिज’ होणार असून बामणोली बाजूला १५० मीटर तर दरे बाजूला ४५० मीटर पोहोच मार्ग होणार आहेत. याचा लाभ आसपासच्या सर्वच गावांना होणार आहे. तर १५० कोटी निधीतून आपटी ते तापोळा असा ५६० मीटरचा केबल स्टे ब्रिज उभा राहणार आहे. आपटी बाजूस २०० मीटर तर तापोळा बाजूस ३०० मीटर पोहोच रस्ते प्रस्तावित आहेत. हा पूल झाल्यानंतर आपटी, वाकी, तेटली, बामणोली आदी गावांना फायदा होणार असून, २५ किलोमीटर अंतराचा प्रवास वाचणार आहे.
या दोन्ही पुलांच्या उभारणीमुळे या भागातील पर्यटन वाढीस चालना मिळेल, या भागातील रोजगार आणि व्यापार वृद्धी होईल. पर्यटकांनाही बामणोलीतून थेट कोकणात उतरता येणार आहे. महाबळेश्वर ते बामणोली असाही प्रवास कमी वेळेत करता येणार असल्याने या दोन्ही पुलांचा फायदा स्थानिकांसह पर्यटकांना होईल, असा विश्वास आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी व्यक्त केला.