साताऱ्यातील कराड उत्तरेत 'मनो"धैर्य' एकवटतयं!, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात 'कमळ' फुलवणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 11:55 AM2022-11-19T11:55:49+5:302022-11-19T11:57:54+5:30

बाळासाहेब पाटलांचा विजयाचा चौकार

Two candidates who fought against each other in the Karad North assembly constituency are active to make the lotus of BJP bloom | साताऱ्यातील कराड उत्तरेत 'मनो"धैर्य' एकवटतयं!, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात 'कमळ' फुलवणार?

साताऱ्यातील कराड उत्तरेत 'मनो"धैर्य' एकवटतयं!, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात 'कमळ' फुलवणार?

googlenewsNext

प्रमोद सुकरे

कराड : राजकारणात कोण कोणाचा कायमचा शत्रू अथवा मित्र नसतो; याचा प्रत्यय वेळोवेळी येत असतो. असाच प्रत्येय सध्या कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात येताना दिसतोय. गत विधानसभेला एकमेकांच्या विरोधात लढलेले दोन उमेदवार चक्क 'कमळ' फुलवण्यासाठी सक्रिय झालेले दिसत आहेत. कराड उत्तर विधानसभा मतदारसंघात भाजपचं 'मनो''धैर्य' एकवटताना पाहयला मिळतयं. पण शेवटी भाजपचा उमेदवार कोण ?हा प्रश्न सध्या अनुत्तरीतच आहे.

कराड उत्तर हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. या मतदारसंघात कराड सह ४ तालुक्यातील भाग जोडला आहे. त्याच कराडचा वाटा जास्त आहे. त्यामुळेच विद्यमान आमदार बाळासाहेब पाटील यांनी येथून विजयाचा चौकार मारला आहे.  त्यांना नेहमी तिरंगी लढतीचा फायदा झाला आहे हेही निश्चित!

गत विधानसभा निवडणुकीला कराड उत्तरची जागा युतीमध्ये शिवसेनेला गेली. त्यामुळे भाजपचे काम करत असलेल्या मनोज घोरपडेंची गोची झाली. तर ऐनवेळी काँग्रेसच्या धैर्यशील कदम यांनी हातात 'धनुष्यबाण' घेण्यात बाजी मारली. पण निकालात त्यांना 'बाजीगर' होता आले नाही. अपक्ष उमेदवार मनोज घोरपडेंना जास्तीची व दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. आणि बाळासाहेब पाटलांचा विजयाचा चौकार जोरात बसला.

त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. बाळासाहेब पाटील राज्याचे सहकार मंत्री झाले. जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांना मिळाले. राजकीय वातावरण बदलले. त्याच दरम्यान एका प्रकरणात मनोज घोरपडेंना अटक झाली. त्यांना काही दिवस तुरुंगातही काढावे लागले. याच दरम्यान एक 'कदम' पुढे टाकत धैर्यशील दादांनी भाजपचे 'कमळ' हातात घेतले. त्यामुळे मनोज दादांना पुन्हा ''घोर'पडला.

मध्यंतरी मनोज घोरपडेंना जामीन मिळाला. ते पुन्हा समाजकारण, राजकारणात सक्रिय झाले. पण आता कराड उत्तरेतील भाजपचा उमेदवार कोण? हा प्रश्न नक्कीच सगळ्यांना पडलाय? त्याचे उत्तर वेळ आल्यावर नक्कीच मिळेल या शंका नाही.

गत आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे सातारा जिल्हा दौऱ्यावर आले होते. त्यात कराड उत्तर मध्ये बरेच कार्यक्रम झाले. त्यावेळी हे दोन्ही 'दादा' त्यांच्याबरोबर मंचावर दिसले. त्यावरून हे 'मनोधैर्य' एकवण्याचे संकेत मिळाले. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कराडच्या शासकीय विश्रामगहात उत्तर विधानसभा मतदार संघातील भाजपची आढावा बैठक झाली. त्यावेळी हे दोन दादा मांडिला मांडी लावून बसलेले दिसले.दोघांनीही उत्तरेत भाजपची ताकद वाढविण्याचा निर्धारही केलाय म्हणे...

दोघांच्यात काही दिवसांपूर्वीही झाली होती बैठक

कराड उत्तर भाजपचे नेते मनोज घोरपडे व धैर्यशील कदम या दोघांच्यात काही दिवसापूर्वीही एक बैठक झाल्याचे खात्रीशीर समजते. म्हणजेच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सातारा जिल्हा दौऱ्यावेळी महामार्गावरील एका गावात ,एका पदाधिकाऱ्यांच्या घरात या दोघांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली आहे. मात्र चर्चेचा तपशील त्या दोघांनाच माहीत .

एका म्यानात दोन तलवारी बसणार कशा ?

एका म्यानात दोन तलवारी बसत नाहीत हे अगदी खरं आहे. पण भाजप कराड उत्तर मतदारसंघात एका म्यानात दोन तलवारी बसवू इच्छित आहे. आता ते अवघड काम सोपे कसे करणार? हे नेत्यांनाच माहीत.

मतदारसंघ नेमका कोणाकडे?

गत विधानसभेला हा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. त्यामुळेच मनोज घोरपडेंची कोंडी झाली होती. आता देखील भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना या दोघांचं राज्यात सरकार आहे. उद्या विधानसभेच्या निवडणुकीला अशीच युती कायम राहील अशी अपेक्षा आहे. त्यावेळेला कराड उत्तर विधानसभा मतदारसंघ नेमका भाजपला की बाळासाहेबांच्या शिवसेनेला जाणार ?हा सुद्धा विषय महत्त्वाचा आहे बरं .

Web Title: Two candidates who fought against each other in the Karad North assembly constituency are active to make the lotus of BJP bloom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.