मायणीमध्ये दोन गाड्यांची समोरासमोर धडक, महिला ठार; तीघे जखमी, अपघातील सर्वजण सोलापुरातील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 01:45 PM2022-10-14T13:45:32+5:302022-10-14T13:45:51+5:30
गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी कृष्णा चारिटेबल ट्रस्ट कऱ्हाड येथे दाखल करण्यात आले
मायणी : मल्हारपेठ-पंढरपूर राज्यमार्ग पक्षी राखीव संवर्धन क्षेत्राजवळ काल, गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर झालेल्या धडकेत एक महिला ठार, तर तिघे जखमी झाले आहेत. महानंदा मधुकर पवार (वय ५५, रा. मोहोळ, जि. सोलापूर) या जागीच ठार झाल्या, तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले.
याबाबत मायणी पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती की, सह्याद्री कारखानाजवळ कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) या ठिकाणी राहत असलेल्या (मूळगाव मोहोळ जि. सोलापूर) येथील मधुकर पवार यांचे कुटुंब चारचाकी टमटम (एमएच ५० ए ३५९०) गाडीने मोहोळकडे निघाले होते. त्याचवेळी सदाशिवनगर माळशिरस येथून चारचाकी (एमएच १२ यूएफ ५८९५) या गाडीने सोपान माणिकराव देवकर येत होते. या दोन्ही चारचाकी वाहनांची मायणी राखीव पक्षी संवर्धन क्षेत्रच्या कार्यालयासमोर समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत महानंदा पवार या जागीच ठार झाल्या, तर सचिन मधुकर पवार, मधुकर बळीराम पवार (तिघेही, रा. मोहोळ, जिल्हा सोलापूर) गंभीर जखमी झाले, तर सोपान माणिकराव देवकर सदाशिवनगर (रा. माळशिरस) हे किरकोळ जखमी झाले आहेत.
मधुकर पवार व मुलगा सचिन पवार हे दोघेही गंभीर जखमी झाले असून, त्यांना पुढील उपचारांसाठी कृष्णा चारिटेबल ट्रस्ट कऱ्हाड येथे दाखल करण्यात आले आहे. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर यांनी भेट दिली. पोलीस पाटील प्रशांत कोळी, पोलीस हवालदार नानासो कारंडे, सत्यवान खाडे, भूषण माने, अजित काळेल, अर्जुन खाडे, वनक्षेत्रपाल महादेव पाटील, वनरक्षक कुंडलिक मुंडे, वन कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांनी यांनी जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.