साताऱ्यात दोन बालविवाह रोखले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:52 PM2018-11-20T22:52:49+5:302018-11-20T22:52:54+5:30
सातारा : कोडोली येथील साईसम्राट मंगल कार्यालयात सुरू असलेला बालविवाह कार्यालयाचे मालक संजय निकम यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. वेळीच ...
सातारा : कोडोली येथील साईसम्राट मंगल कार्यालयात सुरू असलेला बालविवाह कार्यालयाचे मालक संजय निकम यांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. वेळीच निकम यांनी याबाबत प्रशासनाला माहिती दिल्यामुळे दोन बालविवाह रोखण्यात प्रशासन यशस्वी झाले.
याबाबत अधिक माहिती अशी, मंगळवारी कोडोली येथील साईसम्राट मंगल कार्यालयात दोन विवाहांचे आयोजन करण्यात आले होते. त्यासाठी वधू वरांसह वºहाडी मंडळींही भल्या सकाळी कार्यालयात दाखल झाली. वºहाड सकाळी साडेदहा वाजता दाखल झाले. मंगल कार्यालयातील व्यवस्था चोख आहे का? हे बघण्यासाठी संजय निकम सवयीप्रमाणे कार्यालयात पोहोचले. कार्यालयात तेव्हा साखरपुड्याचा कार्यक्रम सुरू होता. त्यावेळी दोन्ही नववधू त्यांच्या नजरेस पडल्या. वय लहान असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी नातेवाइकांकडे त्यांच्या वयाच्या दाखल्याची मागणी केली. सुमारे अर्धा तास टाळाटाळ झाल्यानंतर निकम यांनी आक्रमक पवित्रा घेऊन सर्व विधी थांबविण्याची भूमिका घेतली. त्यानंतर घाबरलेल्या मुलींच्या नातवाइकांनी मुलींचे वय लहान असल्याचे मान्य केले. यातील एकीचे वय १५ वर्षे तर दुसरीचे वय १७ वर्षे होते. निकम यांनी याबाबत प्रशासनाला माहिती देताच अकराच्या सुमारास प्रशासकीय फौज मंगल कार्यालयात दाखल झाली. सुमारे चार तास या सर्वांनी येथे थांबून हा विवाह रोखला आणि पालकांवर प्रतिबंधात्मक कारवाई करून समज देऊन त्यांना सोडले.
या कारवाईसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रोहिणी ढवळे, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा अॅड. मनीषा बर्गे, निवासी नायब तहसीलदार सुनील मुनाळे, सहायक पोलीस निरीक्षक बाजीराव ढेकळे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी के. एम. चव्हाण यांनी सक्रिय सहभाग नोंदविला. प्रशासनाला याबाबत माहिती देऊन दोन बालविवाह रोखल्याबद्दल मंगल कार्यालयाचे मालक संजय निकम यांचा सत्कार करण्यात आला.