बिबट्याच्या हल्ल्यात दोन गायी ठार
By admin | Published: July 25, 2015 11:52 PM2015-07-25T23:52:17+5:302015-07-26T00:02:46+5:30
काळोशी गावात घबराट : एकीकडे चोरट्यांची भीती तर दुसरीकडे प्राण्यांची
सातारा : परळी खोऱ्यातील काळोशी येथे बिबट्याने भरदिवसा दोन गायींवर हल्ला करून त्यांना ठार केले. तसेच एका घरातून एक कुत्रे पळविले. सध्या परिसरात चोरट्यांची टोळी आल्याची अफवा पसरली असतानाच बिबट्याने गायींवर हल्ला चढविल्याने गावात घबराट निर्माण झाली आहे.
काळोशी येथील बाळू गणपत निकम हे डोंगरात गायी घेऊन गेले होते. दुपारी तीनच्या सुमारास बिबट्याने गायीवर हल्ला केला.
या हल्ल्यात गायीचा मृत्यू झाला. तर नथू आण्याबा शेलार हे तामकडा नावाच्या शिवारात जनावरे चारावयास घेऊन गेले होते. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बिबट्याने त्यांच्याही गायींवर हल्ला चढविला. या हल्ल्यात दोन गायी ठार झाल्या. ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती सांगितली. माहिती मिळताच तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. लवकरच नुकसानभरपाई मिळवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले. (प्रतिनिधी)
एका घरातून पळविले कुत्रे
मंगळवारी रात्री दहाच्या सुमारास बिबट्याने गावातील सूर्यकांत लक्ष्मण डफळ यांचे एक कुत्रे गायब केले. गावानजीक तसेच शेतात बिबट्याच्या पावलाचे ठसे ग्रामस्थांना दिसले आहेत. एकीकडे चोरट्यांची भीती तर दुसरीकडे बिबट्याची दहशत यामुळे काळोशी ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.