क्षेत्र माहुलीतील दोघे गुन्हेगार दोन वर्षांसाठी सातारा जिल्ह्यातून तडिपार
By नितीन काळेल | Published: August 30, 2024 07:05 PM2024-08-30T19:05:28+5:302024-08-30T19:09:49+5:30
पोलिस अधीक्षकांची कारवाई : खुनाचा प्रयत्न, जबरी चोरीसह गंभीर गुन्हे नावावर
सातारा : सातारा शहर पोलिस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, खंडणीसह अन्य गंभीर गुन्हे नावावर दाखल असणाऱ्या क्षेत्र माहुलीतील दोघा गुन्हेगारांना संपूर्ण सातारा जिल्ह्यासह लगतच्या जिल्ह्यातीलही काही तालुक्यांतून दोन वर्षासाठी तडिपार करण्यात आले. पोलिस अधीक्षकांनी ही कारवाई केली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार टोळीप्रमुख जयदीप सचिन धनवडे (वय २२) आणि हर्षद संभाजी साळुंखे (२२, दोघेही रा. क्षेत्र माहुली, ता. सातारा) अशी तडिपार झालेल्यांची नावे आहेत. या दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे दाखल होते. संबंधितांना अटक करून प्रतिबंधात्मक कारवाईही करण्यात आली. पण, त्यांच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. सातारा शहर तसेच परिसरात ते सातत्याने गुन्हे करत होते. त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक राहिला नाही. त्यामुळे या टोळीवर कारवाई करण्याची मागणी होत होती. त्यानुसार शहर ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी टोळीविरोधात दोन वर्षे तडीपारबाबत पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे प्रस्ताव पाठवला होता. या प्रस्तावाची चाैकशी पोलिस उपअधीक्षक राजीव नवले यांनी केली.
पोलिस अधीक्षक शेख यांच्यासमोर या तडिपारीबाबत सुनावणी झाली. त्यानंतर दोघांनाही दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले. संपूर्ण सातारा जिल्हा, तसेच पुणे जिल्ह्यातील भोर, बारामती, इंदापूर तालुके. सांगली जिल्ह्यातील कडेगाव, वाळवा तालुका आणि सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातून तडिपारीबाबत आदेश काढण्यात आला आहे. यासाठी सरकार पक्षाच्यावतीने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदर प्रमोद सावंत, अमित सपकाळ, केतन शिंदे, अनुराधा सणस, सातारा शहर ठाण्यातील दीपक इंगवले, संदीप पवार, अमोल सापते यांनी योग्य पुरावा सादर केला.
पावणे दोन वर्षांत १२७ जण तडिपार..
पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी मागील पावणे दोन वर्षांत विविध गुन्ह्यांतील एकूण १२७ गुन्हेगारांना तडीपार केले आहे तसेच एकावर एमपीडीए कायद्यांतर्गत स्थानबद्धतेचीही कारवाईही करण्यात आली आहे. यापुढेही जिल्ह्यातील गुन्हेगारांविरोधात तडीपार, मोक्का, एमपीडीए यासारख्या कडक कारवाया करण्यात येतील, असेही जिल्हा पोलिस दलाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले आहे.