जिल्ह्यात आजपासून दोन दिवस कडक लॉकडाऊन !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:39 AM2021-04-10T04:39:00+5:302021-04-10T04:39:00+5:30
सातारा : शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा शासनाने घालून दिलेल्या वेळेनुसार सुरू राहणार असून नागरिकांनी वैध कारणाशिवाय घराबाहेर पडता ...
सातारा : शनिवार व रविवार अत्यावश्यक सेवा शासनाने घालून दिलेल्या वेळेनुसार सुरू राहणार असून नागरिकांनी वैध कारणाशिवाय घराबाहेर पडता येणार नाही, असा इशारा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी दिला आहे.
शनिवार व रविवार बाहेर फिरण्यावर बंदी असून वैध कारणाने बाहेर पडल्यास नागरिकांना कारण विचारण्यात येणार आहे. अत्यावश्यक सेवेमधल्या ज्या ज्या बाबी आहेत. शनिवार व रविवारीसुद्धा शासनाने ठरवून दिलेल्या नियमानुसार सुरू राहणार आहेत. तसेच ३० एप्रिलपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे. हा जमावबंदी आदेश आठवड्याच्या ७ दिवसांसाठी लागू राहणार आहे. तसेच जिल्ह्यातील उद्योगही ७ दिवस सुरू राहणार आहेत. शिफ्टमध्ये काम सुरू असणाऱ्या उद्योगातील कर्मचाऱ्यांनी आपल्या कंपनीचे फोटो असलेले ओळखपत्र सोबत ठेवावे, त्यांना शनिवार व रविवारी कामावर जाण्यासाठी अडविणार नाही. रेस्टॉरंट व बारमध्ये सोमवार ते शुक्रवार पार्सल सेवा सुरू होती मात्र, शनिवारी व रविवारी ही पार्सल सेवा घ्यायला नागरिकांना बाहेर पडता येणार नाही. परंतु, रेस्टॉरंट व बार यांना घरपोच सेवा देता येऊ शकते. ई-कॉमर्स, शेती संबंधित कामे यांना बंधने नाहीत. लग्नसमारंभासाठी तहसीलदारांची परवानगी घ्यावी. ५० पेक्षा जास्त लोकांनी लग्नसमारंभास उपस्थित राहू नये. कोणी याचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. याचे ग्रामीण भागातील नागरिकांनी काटेकोरपणे पालन करावे. ज्यांचा पोटापाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे, अशांना अन्नधान्याचा पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगून सामाजिक संस्थांनी यासाठी मदत करावी. अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळून इतर दुकाने बंद आहेत, अशा दुकानदारांनी यापूर्वी जसे सहकार्य केले होते. त्याचप्रमाणे यावेळी सहकार्य करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.
रेमडेसीवीर औषधांसाठी स्वतंत्र कक्ष उभारणार
रेमडेसीवीर औषध हे कोरोना संसर्ग रुग्णाच्या नातेवाईकांच्या दबावाखाली दिले जात आहे. तसे न करता डॉक्टरांनी प्रोटॉकॉलप्रमाणे रेमडेसीवीरचे औषध द्यावे. जिल्ह्याला रेमडेसीवीरचा पुरवठा १०० टक्के होईल व रुग्णांना सहजरित्या उपलब्ध होईल, यासाठी पालकमंत्री व लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून प्रयत्न करीत आहोत. रेमडेसीवीरच्या औषधाबाबत रुग्णांच्या नातेवाईकांनी घाबरून जावू नये. गरज असेल तर कोरोना संसर्ग रुग्णास डॉक्टर रेमडेसीवीर औषध देतील. रेमडेसीवीरच्या औषधासाठी लवकरच कक्ष स्थापन करुन या कक्षाच्या माध्यमातून निरसन करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह सांगितले आहे.