कण्हेर धरणाजवळ हरणाची शिकार करणाऱ्या दोघांना पकडले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2021 11:09 PM2021-12-06T23:09:25+5:302021-12-06T23:09:34+5:30
सातारा तालुक्यातील कण्हेर धरणाच्या परिसरामध्ये दोघेजण चाैशिंगा या जातीच्या हरणाची शिकार करून दुचाकीवरून निघाले असल्याची माहिती सातारा वन विभागाचे वनक्षेत्रपाल यांना मिळाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सातारा : चौशिंगा या हरणाची शिकार करणाऱ्या दोघांना वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पकडले. ही कारवाइ सातारा तालुक्यातील कण्हेर धरणाच्या परिसरात सोमवारी दुपारी करण्यात आली.
नथू सखाराम करंजकर (रा. जांभळेवाडी, ता. सातारा), राजकुमार मारूती इंदलकर (रा. कळंबे, ता. सातारा) अशी रंगेहात पकडण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, सातारा तालुक्यातील कण्हेर धरणाच्या परिसरामध्ये दोघेजण चाैशिंगा या जातीच्या हरणाची शिकार करून दुचाकीवरून निघाले असल्याची माहिती सातारा वन विभागाचे वनक्षेत्रपाल यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमसह तत्काळ तेथे जाऊन दोघांना पकडले. त्यांच्याजवळ जखमी अवस`थेतील शिकार केलेले चाैशिंगा हे हरीण सापडले. वन्यजीव संरक्षण अधिनियमान्वे नथू करंजकर आणि राजकुमार इंदलकर या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा अजामीनपात्र असून, गुन्हा सिद्ध झाल्यास किमान तीन वर्षे व जास्तीत जास्त सात वर्षांपर्यंत कायद्यात शिक्षेची तरतूद आहे. न्यायालयाने या दोघांना ७ डिसेंबरपर्यंत वन कोठडी सुनावली आहे.
उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक वनीकरण सुधीर सोनवले, वनक्षेत्रपाल डाॅ. निवृत्ती चव्हाण, वनपाल पावरा, वनरक्षक सुहास भोसले, राजू मोसलगी, मारूती माने, गोरख शिरतोडे यांनी ही कारवाइ केली. याबाबत अधिक तपास साताऱ्याचे वनक्षेत्रपाल डाॅ. निवृत्ती चव्हाण हे करीत आहेत.