Satara: कोयना जलाशयात बुडून दोघींचा मृत्यू; दोघींना वाचविले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 12:22 PM2024-04-01T12:22:05+5:302024-04-01T12:22:25+5:30
महाबळेश्वर (सातारा) : कोयना जलाशयाच्या पात्रात खेळण्यासाठी उतरलेल्या चार मैत्रिणींपैकी दोघींचा बुडून मृत्यू झाला; तर दाेन मुलींना वाचविण्यात आशा ...
महाबळेश्वर (सातारा) : कोयना जलाशयाच्या पात्रात खेळण्यासाठी उतरलेल्या चार मैत्रिणींपैकी दोघींचा बुडून मृत्यू झाला; तर दाेन मुलींना वाचविण्यात आशा सेविकेला यश आले. ही दुर्दैवी घटना काल, रविवारी वाळणे गावाजवळ घडली.
सोनाक्षी रामचंद्र सुतार (वय १२, रा. वाळणे, ता. महाबळेश्वर), सोनाक्षी तानाजी कदम (१२, सध्या रा, वाळणे, मूळ रा. वेंगळे, ता. महाबळेश्वर, जि. सातारा) अशी बुडून मृत्यू झालेल्या दोघींची नावे आहेत.
महाबळेश्वरपासून ४० किलोमीटर अंतरावर वाळणे हे गाव आहे. या गावाजवळून कोयना जलाशयाचे पात्र जाते. या पात्रालगत आशा सेविका शुभांगी तांबे (४३) यांचे घर आहे. त्यांची मुलगी हर्षदा तांबे हिच्याकडे अभ्यास करण्यासाठी वाळणेतील सोनाक्षी सुतार, सोनाक्षी कदम, सृष्टी नलावडे आणि आर्या नलावडे (१२) या चाैघी मैत्रिणी आल्या होत्या. अभ्यास करता-करता कोयना जलाशयाच्या पात्रात खेळण्याचा मोह त्यांना आवरला नाही. चाैघींनाही पोहता येत नव्हते. त्या नदीच्या काठावर पाण्यात उतरल्यानंतर त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे चारीही मुली बुडू लागल्या. त्यांनी आरडाओरड सुरू केला.
त्यांचा आवाज ऐकून नदीकाठच्या घरातील आशा सेविका शुभांगी तांबे या त्यांच्या मदतीला धावल्या. त्यांनी आर्या नलावडे, सृष्टी नलावडे हिला पाण्यातून बाहेर काढले. त्यानंतर सोनाक्षी सुतार हिला बाहेर काढले. मात्र, सोनाक्षीच्या नाकातोंडात पाणी गेल्याने तिचा मृत्यू झाला. आशा सेविका शुभांगी तांबे यांनी आरडाओरड केल्यानंतर धरणात मच्छीमार करणारे लोक बोट घेऊन मदतीसाठी आले. त्यांनी सोनाक्षी कदम हिला पाण्यातून बाहेर काढले. मात्र, तिचाही मृत्यू झाला.