Satara: गर्भलिंग निदान प्रकरणात दोन डॉक्टरांचा सहभाग निष्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2024 11:54 AM2024-02-02T11:54:50+5:302024-02-02T11:55:08+5:30
फलटण येथील पिंप्रद गावाजवळील एका उसाच्या फडात गर्भलिंग निदान होत असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आणले होते
सातारा : फलटण येथील उसाच्या फडात गर्भलिंग निदान करणारे डाॅक्टर, तसेच चाचणीनंतर गर्भवती महिलेचा गर्भपात करणाऱ्या डाॅक्टरचे नाव वाई पोलिसांच्या तपासांत निष्पन्न झाले असून, या प्रकरणात सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे कनेक्शन समोर आले आहे. संबंधित एका डाॅक्टरने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली असून, त्यांना अटक करण्यासाठी वाई पोलिसांचे पथक त्यांच्या मागावर आहे. लवकरच त्यांना अटक केली जाईल, असे तपासी अधिकाऱ्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
फलटण येथील पिंप्रद गावाजवळील एका उसाच्या फडात गर्भलिंग निदान होत असल्याचे ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून समोर आणले होते. त्यानंतर पोलिसांनी या फडात गर्भलिंग निदान चाचणीसाठी गेलेल्या महिलेसह तिचा नातेवाईक आणि एका अज्ञातावर गुन्हा दाखल केला होता. वाई पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळासाहेब भरणे, सहायक फाैजदार विजय शिर्के यांनी, तसेच त्यांच्या पथकाने गेल्या महिनाभरापासून या प्रकरणाचा तपास केला. त्यामध्ये माळशिरसचे कनेक्शन समोर आले.
फलटणच्या उसाच्या फडात गर्भलिंग निदान चाचणी केल्यानंतर संबंधित गर्भवती महिलेने माळशिरस येथे जाऊन एका डाॅक्टरांकडे गर्भपात केल्याचे तपासांत समोर आले. त्यानंतर वाई पोलिसांचे एक पथक संबंधित डाॅक्टरला अटक करण्यासाठी माळशिरसला गेले. मात्र, गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संबंधित डाॅक्टर पसार झाले, तर दुसरीकडे फलटण येथील उसाच्या फडात गर्भलिंग निदान करणारे डाॅक्टरही पसार झाले आहेत. हे डाॅक्टरही अद्याप पोलिसांच्या हाती लागले नाहीत, तेही फरार आहेत. पोलिसांनी अटक करू नये म्हणून माळशिरसमधील संबंधित डाॅक्टरांनी वाई न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली असून, या अर्जावर सोमवारी (दि. ५) सुनावणी होणार आहे.
‘ते’ कायद्याच्या पळवाटा शोधताहेत..
पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांच्या मार्गदर्शनाखाली वाई पोलिसांनी या प्रकरणाचा तपास अतिशय चांगल्या पद्धतीने केला आहे. संबंधित डाॅक्टरांच्या मागावर वाई पोलिस असून, संशयित आरोपींची पळताभुईथोडी झाली आहे. पोलिस ठाण्यात हजर होण्यापेक्षा ते कायद्याच्या पळवाटा शोधत असल्याचे समोर येत आहे.