आरे येथे दोन कुटुंबांत मारामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:24 AM2021-07-12T04:24:42+5:302021-07-12T04:24:42+5:30
सातारा : तालुक्यातील आरे येथे झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन कुटुंबांमध्ये मारामारी झाली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ...
सातारा : तालुक्यातील आरे येथे झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून दोन कुटुंबांमध्ये मारामारी झाली. याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या असून, दोन्ही कुटुंबातील सहाजणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, सुभाष खाशाबा महाडिक (वय ७०, रा. आरे, ता. सातारा) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, दि. १० रोजी आरे येथे राहत्या घरासमोर झालेल्या भांडणाचा राग मनात धरून कविता चक्के, नारायण खाशाबा महाडिक, सुलोचना नारायण महाडिक, आनंदिता चक्के (सर्व, रा. आरे, ता. सातारा) या चौघांनी संगनमताने सुभाष यांच्या पत्नी शशिकला यांना मारहाण केली. कविता हिने शशिकला यांच्या पाठीवर लाकडी दांडक्याने, तर नारायण याने त्यांचे केस ओढून त्यांना हात आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. सुलोचना आणि आनंदिता या दोघींहीनी शशिकला यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत शिवीगाळ, दमदाटी करीत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सुभाष यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर या चौघांवरही गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोलीस नाईक शिखरे करीत आहेत.
दरम्यान, कविता नरेंद्र चक्के (वय ५१, रा. आरे) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, चुलते सुभाष खाशाबा महाडिक आणि शशिकला सुभाष महाडिक यांनी आपआपसांत संगनमत केले आणि माझ्या डोकीचे केस पकडून मला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी वडील नारायण खाशाबा महाडिक यांना लाकडी दांडक्याने मारहाण केली, तर शशिकला हिने दोघांच्याही हाताचा चावा घेतला. याप्रकरणी कविता यांनी तक्रार दिल्यानंतर सुभाष आणि शशिकला या दोघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.