शेततळ्यात बुडून महिलेसह दोन मुलींचा मृत्यू, सहाजण बचावले
By दीपक शिंदे | Published: May 16, 2023 06:17 PM2023-05-16T18:17:45+5:302023-05-16T18:18:02+5:30
पाडळी-हेळगावमधील घटना, दोरी तुटल्याने सर्वजण बुडाले
कऱ्हाड : शेततळ्यात दोरीच्या सहाय्याने पोहताना दोरी तुटल्यामुळे आठ ते दहाजण तळ्यात बुडाले. त्यावेळी पोहोयला येणाऱ्यांनी सातजणांना वाचवले. मात्र, एका महिलेसह दोन मुलींचा बुडून मृत्यू झाला. ही घटना पाडळी-हेळगाव, ता. कऱ्हाड येथे मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
शोभा नितीन घोडके (वय ३५), रागिणी रामचंद्र खडतरे (८) व वैष्णवी गणेश खडतरे (१५) अशी बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, पाडळी-हेळगाव येथे एका शेतकऱ्यांच्या शेतावर शेतमजुरी करणारे कुटुंब वास्तव्यास आहे. डोंगरालगत असलेल्या या शेतात पाण्यासाठी मोठे शेततळे बांधण्यात आले आहे. या तळ्यावर शेतमजुरांसह काहीजण पोहण्यासाठी जातात. तसेच शेततळ्यात पोहताना आधार मिळावा, यासाठी तळ्यात दोरी बांधली होती. मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास शेततळ्यावर पोहण्यासाठी सुमारे दहाजण गेले होते. यावेळी ज्यांना पोहता येत नाही, असे दोरीचा आधार घेत पोहण्यासाठी पाण्यात उतरले.
यादरम्यान दोरीला जास्त जणांनी एकाचवेळी पकडल्याने दोरीवर अतिरिक्त ताण येवून दोरी तुटली. त्यामुळे दोरीचा आधार घेतलेले सर्वजण पाण्यात बुडू लागले. ही बाब इतरांच्या लक्षात येताच त्यांनी बुडणाऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये सहाजणांना वाचवण्यात यश आले. मात्र, एका महिलेसह दोन मुली तळ्यात बुडाल्या. त्यांनाही तात्काळ पाण्याबाहेर काढून उपचारासाठी कऱ्हाडच्या वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.