कारच्या धडकेत दहावीतील दोन मुली ठार
By admin | Published: June 4, 2017 01:08 AM2017-06-04T01:08:24+5:302017-06-04T01:08:24+5:30
अतीतजवळील घटना : दुचाकीवरून क्लासला जाताना झाला अपघात
लोकमत न्यूज नेटवर्क
उंब्रज: दुचाकीवरून क्लासला जात असताना पाठीमागून कारने दिलेल्या भीषण धडकेत दुचाकीवरील दोन्ही मुली जागीच ठार झाल्या. हा अपघात शनिवारी सकाळी साडेसात वाजता अतीत ता. सातारा येथे झाला. दोघींनीही दहावीची परीक्षा दिली होती.
शिवानी अशोक काजळे (वय १६, रा. तुकाईवाडी ता. सातारा), जान्हवी पोपट जाधव (वय १६, रा. अतीत ता. सातारा) अशी अपघातात ठार झालेल्या मुलींची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, या दोघींनी नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. सुटीमध्ये त्यांनी अतीतमध्येच संगणकाचा कोर्सला प्रवेश घेतला होता. नेहमीप्रमाणे शनिवारी सकाळी सात वाजता शिवानी आणि जान्हवी दुचाकीवरून क्लासला जात होत्या. मात्र दुचाकीमधील पेट्रोल संपल्याने त्या माजगाव फाट्याजवळ असणाऱ्या पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी जात होत्या. यावेळी पुणे बाजूकडून कोल्हापूरकडे निघालेल्या कारने या दोघींना पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारने धडक दिल्यानंतर या दोघीही हवेत उंच फेकल्या गेल्या. त्यानंतर त्या डांबरावर पडल्यामुळे त्यांच्या डोक्याला आणि हाता पायाला गंभीर जखम झाली. त्यामुळे दोघींचाही जागीच मृत्यू झाला.
कार प्रचंड भरधाव वेगात असल्यामुळे या दोघींना धडक देऊन कार रस्त्या ओलांडून चक्क शेतात जाऊन उभी राहिली. या अपघातात दोन्ही मुलींचा जागीच मृत्यू
झाल्याचे समजताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी एकच गर्दी केली. दोन्ही मुलींचे मृतदेह महामार्गावर काहीवेळा तसेच पडून होते. काही नागरिकांनी तत्काळी एका खासगी वाहनाने नागठाणे येथील प्राथिमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र डॉक्टरांनीही दोघींनाही मृत घोषीत केले.
शिवानी आणि जान्हवीच्या नातेवाईकांनी रुग्णालयासमोर आक्रोश केला. हा आक्रोश पाहून ्नरुग्णालयात उपस्थित असलेल्या नागरिकांनाही आपले आश्रू आवरता आले नाहीत.
या अपघातानंतर बोरगाव पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला.
दोघी एकाच कॉलेजमध्ये घेणार होत्या प्रवेश !
जान्हीवी अणि शिवानी दहावीमध्ये एकाच वर्गात शिकत होत्या. त्यामुळे दोघींची चांगली मैत्री झाली होेती. दहावीची परीक्षा झाली असतानाही दोघींनीही एकाच क्लासमध्ये प्रवेश घेतला होता. जिकडे जाईल तिकडे दोघी एकत्र दिसायच्या. शिवानी ही अतीतमध्ये अत्याकडे वास्तव्यास होती. त्यामुळे त्यांचे एकमेकींच्या घरी येणे-जाणे असायचे. अकरावीमध्ये एकाच कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायचा, असे दोघींनीही ठरविले होते, असे त्यांच्या मैत्रिणी सांगत होत्या. शिवानीच्या एक भाऊ, आई वडील तर जान्हवीच्या पश्चात आई आणि बहीण असा परिवार आहे.