मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात दोन शेळ्या, चार बोकडांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 25, 2021 04:27 AM2021-06-25T04:27:19+5:302021-06-25T04:27:19+5:30
उंब्रज : येथील पोलीस ठाण्यासमोरील वसाहतीतील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या शेळ्यांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. यात दोन शेळ्या, चार बोकडांचा ...
उंब्रज : येथील पोलीस ठाण्यासमोरील वसाहतीतील पत्र्याच्या शेडमध्ये असलेल्या शेळ्यांवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला. यात दोन शेळ्या, चार बोकडांचा फडशा पाडला. यामध्ये संबंधित शेतकऱ्यांचे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, येथील पोलीस ठाण्याच्या विरुद्ध बाजूला सेवारस्त्याच्या काही अंतरावर शेतकरी बाबासाहेब हणमंत जाधव यांचे पाळीव जनावरांचे पत्र्याचे शेड आहे. यामध्ये दोन शेळ्या, चार बोकड व दोन म्हशी बांधण्यात आल्या होत्या. शेतकरी जाधव हे गुरुवारी पहाटेच्या सुमारास शेडमध्ये गेले असता त्यांना दोन शेळ्यांसह चार बोकडांचा अज्ञात जनावरांच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचे दिसले. हल्ल्यात दोन बोकड गंभीररीत्या जखमी झाल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत तत्काळ वराडे येथील वन विभागाच्या कार्यालयात या घटनेची माहिती दिली. वनरक्षक दीपाली अवघडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली. त्या ठिकाणची पाहणी केली. यानंतर वनरक्षक दीपाली अवघडे यांनी सांगितले की, शेळ्यांवर झालेला हल्ला जंगली श्वापदांनी केलेला नसून, मोकाट कुत्र्यांच्या टोळक्याने केलेला आहे. या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात शेतकरी जाधव यांचे सुमारे साठ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांनी नुकसानभरपाई मिळावी म्हणून मागणी त्यांनी केली आहे.