शिवथर येथे दोन गटांत वाटेवरून मारामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:35 AM2021-01-18T04:35:33+5:302021-01-18T04:35:33+5:30
सातारा: तालुक्यातील शिवथर येथे शेतातून येण्या-जाण्याच्या कारणावरून झालेल्या मारामारीप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. यावरून ...
सातारा: तालुक्यातील शिवथर येथे शेतातून येण्या-जाण्याच्या कारणावरून झालेल्या मारामारीप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. यावरून १२ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
प्रशांत सुभाष साबळे (वय ३१, रा. शिवथर, ता. सातारा) याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शुक्रवार, दि. १५ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास शिवथर येथील अंबवळी शिवारात गेलो होतो. शेतातील सरबांधावरून जात असताना रमेश साबळे, सुधीर साबळे, प्रदीप साबळे, राजेंद्र साबळे, जीवन साबळे, चेतन साबळे (सर्व रा. शिवथर, ता. सातारा) यांनी अडवत ''तू सरबांधावरून जायचा संबंध नाही आणि तू येथून जायचे नाही,'' असे बजावले. यावरून भांडण सुरू झाले आणि त्याचे पर्यावसान मारामारीत झाले. यावेळी या सहा जणांनी धक्काबुक्की करत शिवीगाळ आणि दमदाटी केली. हा प्रकार सुरू असतानाच रमेश साबळे याने माझ्या डोक्यात दगड फेकून मारला.
अधिक तपास पोलीस हवालदार जाधव हे करत आहेत.
दरम्यान, ऊर्मिला रमेश साबळे (वय ३५, रा शिवथर) यांनी दिलेल्या तक्रारीनंतर सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, शिवथर येथील अंबवळी शिवारात शिवथर ते मालगावकडे जाणाऱ्या डांबरी रस्त्यावर त्यांचे पती रमेश दत्तात्रय साबळे यांना जागेतून येण्या-जाण्यावरून प्रशांत साबळे, सूरज साबळे, तेजस साबळे, शुभम साबळे, प्रज्वळ साबळे, निवास ( सर्व रा. शिवथर) यांनी शिवीगाळ, दमदाटी करून धक्काबुक्की केली. यावेळी रमेश यांना प्रशांतने लाकडी काठीने मारहाण केली. यात त्यांना मुका मार लागला आहे. याचवेळी ही भांडणे सोडविण्यास ऊर्मिला यांचे दीर प्रदीप साबळे, पुतण्या राजेंद्र साबळे आणि चेतन साबळे आले असता त्यांनाही धक्काबुक्की करून शिवीगाळ, दमदाटी केली.
याबाबत अधिक तपास पोलीस हवालदार बागवान हे करत आहेत.