कोरेगावात दोन गटांत तुंबळ हाणामारी
By admin | Published: February 21, 2015 11:24 PM2015-02-21T23:24:55+5:302015-02-21T23:46:09+5:30
परस्परविरोधी तक्रारी : १३ जणांना अटक, शांततेचा भंग केल्याप्रकरणीही गुन्हा नोंद
कोरेगाव : रहिमतपूर येथे झालेल्या जुन्या भांडणाच्या रागातून शुक्रवारी रात्री शहरातील अण्णा भाऊ साठे नगरामध्ये दोन गटांत तुंबळ हाणामारी झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी कोरेगाव पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी दहाजणांच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
दरम्यान, पोलीस ठाण्याच्या आवारात हाणामारी करून गोंधळ घालत सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी पंधरा जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी १३ जणांना अटक केली आहे. त्यांची जामिनावर मुक्तता करण्यात आली.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की , अण्णा भाऊ साठे नगर येथील लेंडुरी नाल्यावरील पुलावर बाळासाहेब ऊर्फ सतीश बोतालजी हे दुचाकी घेऊन उभे होते. त्याचवेळी विकी बोतालजी याला त्याची ‘दुचाकी बाजूला घे,’ असे म्हटल्यावरून त्याच्यासह चंद्रकांत बोतालजी, लक्ष्मण बोतालजी, नितीन बोतालजी व आशा बोतालजी यांनी रहिमतपूर येथे झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून शिवीगाळ, दमदाटी करत हाताने मारहाण केली. याप्रकरणी सतीश बोतालजी यांनी तक्रार दाखल केली आहे.
विकी बोतालजी याने दिलेल्या तक्रारीमध्ये म्हटले आहे की, रहिमतपूर येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून बाळासाहेब ऊर्फ सतीश बोतालजी याने स्वत:ची दुचाकी जाणीवपूर्वक माझ्या दुचाकीला धडकवली. त्यानंतर सतीश बोतालजी याच्यासह शशिकांत बोतालजी, युवराज बोतालजी, राजेंद्र बोतालजी व संतोष बोतालजी यांनी एकत्रित येऊन माझ्याशी आणि माझ्या घरातील लोकांशी वाद घालत शिवीगाळ व दमदाटी केली. यावेळी चंद्रकांत बोतालजी याच्या हाताला दुखापत झाली. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी दोन गुन्हे नोंद केले आहेत.
दरम्यान, भांडणानंतर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार देण्यास आलेल्या दोन्ही गटांतील जमावामध्ये पोलीस ठाण्याच्या समोरील मैदानामध्ये तुंबळ हाणामारी झाली. शिवीगाळ, दमदाटी करत मोठमोठ्याने आरडाओरडा करत जमावबंदी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी बाळासाहेब ऊर्फ सतीश बोतालजी, पंचायत समिती सदस्य रवींद्र बोतालजी, अशोक बोतालजी, सुरेश बोतालजी, शशिकांत बोतालजी, युवराज बोतालजी, राजेंद्र बोतालजी, अक्षय बोतालजी, प्रशांत संगपाळ, विकी बोतालजी, चंद्रकांत बोतालजी, लक्ष्मण बोतालजी, आशा बोतालजी, नितीन बोतालजी व सुरेश बोतालजी यांच्या विरोधात सरकारतर्फे हवालदार सतीश साबळे यांनी फिर्याद दाखल केली आहे. कोरेगाव पोलीस अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)