शिरवळ, कोरेगावात मुलींसाठी दोन वसतिगृहे शासनाकडून कोट्यवधींच्या निधीची तरतूद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2018 10:53 PM2018-03-30T22:53:33+5:302018-03-30T22:53:33+5:30
शिरवळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यामध्ये मुलींना शिक्षण घेणे सोयीचे व्हावे, त्याकरिता शासनाच्या वतीने मुलींसाठी विभागीय स्तरावर
मुराद पटेल ।
शिरवळ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त राज्यामध्ये मुलींना शिक्षण घेणे सोयीचे व्हावे, त्याकरिता शासनाच्या वतीने मुलींसाठी विभागीय स्तरावर ७ आणि जिल्हा व तालुकास्तरावर ४३ अशा ५० ठिकाणी नवीन शासकीय वसतिगृहे उभारण्यात आली होती. पैकी सातारा जिल्ह्यातील शिरवळ, कोरेगाव येथील दोन शासकीय वसतिगृहांना शासनाने कोट्यवधींचा निधी मंजूर केला आहे.
याबाबत ‘लोकमत’ने १० जानेवारी २०१८ रोजी ‘मुलींच्या वसतिगृहाला दशकाची प्रतीक्षा’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध करीत या प्रश्नाला वाचा फोडली होती. त्यानुसार शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती वर्षानिमित्त वसतिगृहांच्या उभारणीसाठी १० कोटी ७५ लाख ९१ हजार ४५९ रुपयांच्या अंदाजपत्रकास नुकतीच प्रशाकीय मान्यता दिली आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी विकास देशमुख यांच्या १९ मे २०१० च्या आदेशाने शिरवळ येथील गट नं. ९४४ मध्ये समाजकल्याण अधीक्षक वसतिगृहासाठी १ हेक्टर ६० आर जमीन सामाजिक न्याय विभागाच्या नावे देण्यात आली होती. तत्कालीन आघाडी शासनाच्या काळातील मुलींसाठीची वसतिगृहाची ही घोषणा ११ वर्षांपासून फक्त कागदावरच राहिली होती. सामाजिक न्याय विभागाच्या सूचनेनंतर बांधकाम विभागाने वसतिगृह इमारत उभारणीच्या प्रशासकीय मान्यतेसाठी ११ ते १२ कोटींचा अंदाजपत्रकीय प्रस्ताव शासनास सादर केला होता.
या प्रस्तावाला शासनाकडून नुकतीच मान्यता मिळाली असून, शासनाच्या १२ मार्च २०१८ च्या परिपत्रकान्वये शिरवळ येथील गट नं. ९४४ मधील १ हेक्टर ६० आर जागेत शंभर खाटांचे मागासवर्गीय वसतिगृह उभारणीकरिता १० कोटी ७५ लाख ९१ हजार ४५९ रुपयांच्या अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. या प्रशासकीय मान्यतेची बातमी कळताच शिरवळ नागरिकांनी आनंदोत्सव साजरा करून ‘लोकमत’चे आभार मानले.
शिरवळ, नायगाव ग्रामस्थांसह ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केल्याने शिरवळच्या मुलींच्या वसतिगृहाला शाशनाकडून कोट्यवधींचा निधी मिळाला आहे. ‘लोकमत’ने केलेल्या पाठपुराव्याबद्दल मनापासून आभारी आहे.
- राजेंद्र नेवसे, माजी सरपंच, नायगाव
वसतिगृहाच्या अंदाजपत्रकास नुकतीच मान्यता मिळाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत पाठपुरावा करून निधी वर्ग करून शिरवळच्या भर घालणाºाा मुलींच्या वसतिगृहाची उभारणी लवकरात लवकर करावी.
- विजयकुमार गायकवाड,
सहायक आयुक्त, समाजकल्याण विभाग
शिरवळचे वैभव वाढवणाऱ्या मुलींच्या शासकीय वसतिगृहासाठी शिरवळकरांकांनी जमीन उपलब्ध करून दिली होती. वसतिगृहाला कोट्यवधींचा निधी मिळाल्याने शिरवळच्या विकासाला चालना मिळेल.
- राजेंद्र तांबे, सदस्य, खंडाळा पंचायत समिती