पाचगणीहून महाबळेश्वरला जाण्यासाठी तब्बल दोन तास
By admin | Published: October 26, 2014 09:30 PM2014-10-26T21:30:28+5:302014-10-26T23:25:32+5:30
कुठे नेऊन ठेवला महाबळेश्वर माझा : मोठे उत्पन्न मिळून सुविधा पुरविण्यात अपयश
महाबळेश्वर : सातारा जिल्ह्यातील पाचगणी आणि महाबळेश्वर ही दोन शहरे थंड हवेची ठिकाणे म्हणून जगात नावारूपास आली आहेत. दोन शहरातील अंतर केवळ १९ किलोमीटर. मात्र, रस्ता खराब असल्याने तसेच वाहनांची कोंडी वाढल्याने पाचगणीहून महाबळेश्वरला येण्यास तब्बल दीड ते दोन तास लागत आहेत. पर्यटकांकडून मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळते, तरीही त्यांना सुविधा देण्यात अपयश आल्याने ‘कुठे नेऊन ठेवलाय महाबळेश्वर माझा’ असा प्रश्न स्थानिकांतून विचारला जात आहे.
महाबळेश्वर, पाचगणी, वाई परिसरात सलग सुटी साजरी करण्यासाठी लाखो पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. त्यांच्याकडून महाबळेश्वर शहरात प्रवेश करताच त्यांच्याकडून पर्यटक कर घेतला जातो. त्यांना प्रतिमाणूस कर घेऊन तशा पावत्याही दिल्या जातात. त्याचप्रमाणे वाहनतळासाठीही पैसे घेतले जातात. मात्र, त्यांना त्या प्रमाणात सुविधा पुरविण्यात प्रशासन यंदा अपयशी ठरत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
पाचगणीपासून महाबळेश्वरपर्यंतच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे लांबचलाब वाहनांच्या रांगा लागत आहेत. शहरातील कर नाक्यावरही रांगा लागलेल्या आहेत. तसेच शहरातील सिग्नल यंत्रणाही बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे बाहेरील पर्यटकांना वाहने चालविताना अडचणी येत होत्या. येथील सिग्नल यंत्रणा सुरू करण्याची मागणी होत आहे.
सातारा शहरातून पोलिसांना मदतीसाठी बोलाविले जातात. यावेळी हंगामाचे चार दिवस होऊनही शहरात केवळ आठ-दहा कर्मचारी दिसत आहेत. महाबळेश्वर पोलिसांवरही ताण येत आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये नाराजीचा सूर निघत आहेत. जगभरातून येत असलेल्या पर्यटकांना चांगल्या सुविधा न पुरविल्यास महाबळेश्वरविषयी चुकीचा संदेश बाहेर जाऊ शकतो. पर्यटकांना ‘अतिथी देवो भव:’ समजून स्थानिक नागरिक त्यांची सेवा करत असला तरी प्रशासनाने चांगल्या सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी होऊ लागली आहे. (प्रतिनिधी)