साताऱ्यातील राजपथावर दोन तास वळूंची झुंज, बालकांमध्ये घबराट : वाहनांची मोडतोड; वाहतुकीची कोंडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2018 11:52 AM2018-01-09T11:52:16+5:302018-01-09T11:56:44+5:30
राजपथ म्हणजे सातारकरांचा जणू जीवनमार्गच आहे. शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, शासकीय कार्यालयांत जाणाऱ्यांसाठी सकाळी या मार्गावरूनच जावे लागते. ऐन वर्दळीच्या वेळी या मार्गावर दोन वळूंची झुंज लागली. जागा सापडेल तिकडे ते सैरावैरा धावत असल्याने महिला, तरुणी, लहान मुलांची पळापळ झाली. अधूनमधून ते रस्त्यावर येत असल्याने वाहतूकही विस्कळीत होत होती.
सातारा : राजपथ म्हणजे सातारकरांचा जणू जीवनमार्गच आहे. शाळा, महाविद्यालय, बसस्थानक, शासकीय कार्यालयांत जाणाऱ्यांसाठी सकाळी या मार्गावरूनच जावे लागते. ऐन वर्दळीच्या वेळी या मार्गावर दोन वळूंची झुंज लागली. जागा सापडेल तिकडे ते सैरावैरा धावत असल्याने महिला, तरुणी, लहान मुलांची पळापळ झाली. अधूनमधून ते रस्त्यावर येत असल्याने वाहतूकही विस्कळीत होत होती.
राजवाडा ते पालिका दरम्यानच्या कमानी हौदाजवळ मंगळवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास दोन वळूंची झुंज लागली. एकमेकांना टकरी देत प्रतिस्पर्धीला मागे ढकलण्याच्या प्रयत्नांत रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक मोटारसायकलींचे नुकसान झाले.
काही वेळेत ते शांत होतील, असे वाटत असतानाच अर्धा-पाऊण तास झाला तरी ते थांबण्याचे नाव घेत नव्हते. अनेक नागरिक दुकानाच्या कठड्यावर जाऊन झुंज पाहत होते. काही तरुण काठीच्या साह्याने ती सोडविण्याचा प्रयत्न करत होते. पण प्रयत्न निष्पळ ठरले.
त्यातील एक बैल फुटपाथवरुन सात फुट खोल बेसमेंटमध्ये पडला. त्यानंतर रस्त्या कडेच्या गाड्या पाडल्या. खाली पडलेला बैलही वर आला. अन् पुन्हा त्यांच्यामध्ये झुंज सुरू झाली. जमलेल्या शेकडो जमावाने आरडाओरड केल्यानंतर ते दोन्ही वळू पळून गेले.