राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये २४६ प्रकरणे निकाली
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 03:21 PM2019-09-15T15:21:45+5:302019-09-15T15:21:53+5:30
राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण ११ हजार १० वादपूर्ण प्रकरणे ठेवण्यात आली होती.
सातारा: राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये सातारा जिल्ह्यातील एकूण ११ हजार १० वादपूर्ण प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २४६ प्रकरणे निकाली निघाली. सातारा जिल्हा न्यायालयात राष्ट्रीय लोकअदालतीचे उद्घाटन प्रमुख जिल्हा न्यायाधीश राजेंद्र सावंत यांच्या हस्ते झाले
जिल्ह्यात एकूण ९ हजार ९८८ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी ७०२ प्रकरणात तडजोड झाली. त्यामध्ये एकूण ७,२४,०७, २४८ रुपयांची वसुली करण्यात आली. भूसंपादन प्रकरणे २२७ ठेवण्यात आली. त्यापैकी १९ प्रकरणे निकाली निघाली असून त्यामधून १,३६,८१,३०९ नुकसान भरपाई रक्कम देण्यात आली. तसेच मोटार अपघात प्रकरणे ३५८ ठेवण्यात आली. त्यापैकी ८ प्रकरणे निकाली निघाली असून त्यामध्ये नुकसान भरपाई म्हणून ६०,६९,७४७ रुपये देण्यात आली. यामध्ये वैवाहिक वाद, भूसंपादन प्रकरणे, मोटार अपघात नुकसान भरपाईचीही प्रकरणे तसेच कर्ज, धनादेश न वटल्याची प्रकरणे या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ठेवण्यात आली होती.
तसेच जिल्हा न्यायालयात एकूण ९ पॅनलवर जिल्हा न्यायाधीश एन. एल. मोरे, एस. आर. पवार, बी. एस. वावरे तसेच इतर सर्व न्यायीक अधिकारी वकील, ज्येष्ठ नागरिक, विधी स्वयंसेवकांनी या अदालतीचे काम पाहिले. लोकअदालतीमधून प्रकरणे तडजोडीने मिटवावीत, यासाठी भविष्यात आणखी प्रबोधन केले जाईल, असे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश प्रवीण कुंभोजकर यांनी सांगितले.