जिल्हा कारागृहात दोन कैद्यांमध्ये राडा, भलतच आहे कारण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2022 05:53 PM2022-04-02T17:53:52+5:302022-04-02T17:54:13+5:30
जेल प्रशासनास हा प्रकार सांगितल्यास जीवे ठार मारेन, अशीही त्याने धमकी दिली.
सातारा : शरीराशी लगट करू देत नसल्याच्या कारणावरून एका कैद्यांने दुसऱ्या कैद्यांला बेदम मारहाण केल्याची घटना जिल्हा मध्यवर्ती कारागृहात घडली. याप्रकरणाची कारागृह प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून, संबंधित कैद्यांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. काल, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास हा राडा झाला. विकास भीमराव बैले (रा. कुशी, ता. पाटण) असे गुन्हा दाखल झालेल्या कैद्याचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, विकास बैले हा सध्या न्यायालयीन कोठडीत असून, त्याला जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील बॅरेक क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच बॅरेकमध्ये दुसरा बंदिजन अक्षय दिनकर यादव हा सुद्धा वास्तव्यास आहे. शुक्रवारी सायंकाळी विकास बैले याने अक्षयच्या शरीराशी लगट करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी अक्षयने त्याला विरोधात केल्याने विकास बैले याने त्याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली. तसेच त्याच्या चेहऱ्यावर फाईट मारल्याने तो गंभीर जखमी झाला. जेल प्रशासनास हा प्रकार सांगितल्यास जीवे ठार मारेन, अशीही त्याने धमकी दिली.
परंतु काही वेळानंतर या प्रकाराची माहिती कारागृहातील पोलिसांना समजल्यानंतर पोलिसांनी तत्काळ बॅरेकमध्ये धाव घेऊन दोघांना वेगळे केले. त्यानंतर विकास बैले याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत कारागृहातील हवालदार सखाहरी शिंदे यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पोलीस उपनिरीक्षक ए.ए. वाघमोडे हे अधिक तपास करीत आहेत.