जीप उलटून दोन ठार; बारा महिला गंभीर
By admin | Published: March 13, 2017 05:08 PM2017-03-13T17:08:12+5:302017-03-13T17:08:12+5:30
तारळेतील दुर्घटना : शेतमजूर महिलांवर काळाचा घाला; चालकाचा ताबा सुटल्याने अपघात
जीप उलटून दोन ठार; बारा महिला गंभीर
तारळेतील दुर्घटना : शेतमजूर महिलांवर काळाचा घाला; चालकाचा ताबा सुटल्याने अपघात
तारळे (सातारा) : चालकाचा ताबा सुटल्याने जीप रस्त्यानजीकच्या नाल्यात उलटून युवतीसह विवाहिता ठार झाली. तर बारा शेतमजूर महिला जखमी झाल्या. तारळे-घोट मार्गावर तारळे, ता. पाटण गावच्या हद्दीत शिवलिंग मंदिरानजीकच्या वळणावर शनिवारी (दि. ११) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. जखमींवर सातारच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आशा नितीन कदम (वय २७) व सुनीता धोंडिराम काळे (२२, रा. जांभेकरवाडी, ता. पाटण) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत. तर रंजना रमेश कदम, नंदा श्रीरंग कदम, सुशीला राजाराम महाडिक, सईबाई धोंडिराम काळे, अलका विलास कदम, सोनाबाई सुभाष कदम, भागुबाई आनंदा कदम, मनीषा सत्यवान कदम, द्रौपदा आनंदा कदम, भारती बाळकृष्ण जाधव, सुमन मारुती भंडारे (सर्व रा. जांभेकरवाडी, ता. पाटण) व वंदना कृष्णत जाधव (रा. मरळोशी, ता. पाटण) या जखमींवर शासकीय तसेच खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघात स्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, तारळे परिसरातील अनेक खासगी जीपमधून विभागातील महिला भांगलण तसेच वीटभट्टीच्या कामासाठी शिरगाव व उंब्रज परिसरात जातात. जांभेकरवाडी येथील महिलाही दररोज एका जीपने (एमएच ३० बी ६९३८) भांगलणीच्या कामासाठी जात होत्या. शनिवारीही संबंधित महिला कामावर गेल्या होत्या. दिवसभर काम आटोपल्यानंतर सायंकाळी त्या शिरगावहून तारळेत आल्या. शनिवारी तारळेचा आठवडी बाजाराचा दिवस असतो. संबंधित महिलांनी त्या बाजारात आवश्यक ती खरेदी केली. त्यानंतर रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास जीपमधून सर्व महिला जांभेकरवाडीकडे जाण्यासाठी निघाल्या. जीप तारळे गावच्या हद्दीतील शिवलिंग मंदिरानजीकच्या वळणावर पोहोचली. त्या वळणावर एक झाड पडले असून, ते निम्म्या रस्त्यापर्यंत आहे. तसेच वळणानजीकच एक ट्रकही लाईट सुरू करून थांबला होता. रस्त्यावर निम्म्यापर्यंत पडलेले झाड व समोरील ट्रकचा प्रकाशझोत यामुळे वेगात निघालेल्या जीपवरील चालकाचा ताबा सुटला. चालकाने जीप साईडपट्टीवर घेण्याचा प्रयत्न केला असता रस्त्याचा अंदाज न आल्याने जीप नाल्यात जाऊन डाव्या बाजूवर उलटली.
अपघातानंतर महिलांनी आरडाओरडा सुरू केला. हा आवाज ऐकून परिसरातील ग्रामस्थांनी त्याठिकाणी धाव घेतली. त्यांनी मिळेल त्या वाहनाने जखमी महिलांना उपचारार्थ रुग्णालयात हलवले. काही महिलांना सातारच्या शासकीय रुग्णालयात तर काहींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यामध्ये उपचार सुरू असताना आशा कदम व सुनीता काळे या दोघींचा मृत्यू झाला. इतर जखमींवर अद्यापही उपचार सुरू आहेत. अपघाताची नोंद तारळे पोलिस दूरक्षेत्रात झाली आहे. उपनिरीक्षक एम. के. आवळे तपास करीत आहेत.
चालकावर गुन्हा दाखल
तारळेनजीक शिवलिंग मंदिर येथे असणारे संबंधित वळण धोकादायक असून, या वळणावर अनेकवेळा चालकांची फसगत होते. शनिवारी रात्री झालेल्या अपघातप्रकरणी नितीन मारुती कदम यांनी तारळे पोलिस दूरक्षेत्रात फिर्याद दिली आहे. त्या फिर्यादीनुसार जीप चालक महेश बाळासाहेब जाधव (वय ३७, रा. तारळे, ता. पाटण) याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.