दोन किलोचा कोबी केवळ दोन रुपयाला! शेतकऱ्यांची चेष्टा, बाजारपेठेत दर मिळेना
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 02:47 AM2021-02-11T02:47:37+5:302021-02-11T02:47:55+5:30
नलवडे यांनी उसात आंतरपीक म्हणून एक एकर क्षेत्रावर कोबीचे उत्पादन घेतले होते. त्यांनी सात हजार कोबीच्या रोपांची लागवड डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली. यासाठी त्यांनी मोठी मेहनतही घेतली.
- शंकर पोळ
कोपर्डे हवेली (जि. सातारा) : सध्या बाजारपेठेत भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने शेतकऱ्यांचा माल कवडीमोलाने विकला जात आहे. दर मिळत नसल्याने पार्ले (ता. कऱ्हाड) येथील शेतकरी रविराज नलवडे यांनी एक एकर क्षेत्रावरील कोबीचे तोडे बंद केले आहेत.
नलवडे यांनी उसात आंतरपीक म्हणून एक एकर क्षेत्रावर कोबीचे उत्पादन घेतले होते. त्यांनी सात हजार कोबीच्या रोपांची लागवड डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात केली. यासाठी त्यांनी मोठी मेहनतही घेतली. या खेपेला चांगला मिळेल, या आशेवर त्यांनी उत्पादन खर्च जास्त केला. परिणामी, कोबीचे गड्डे चांगले आले होते. यामुळे ते खूप आनंदात होते. दोन किलोपासून अडीच किलोपर्यंतचे गड्डे होते. किलोवर गड्ड्याची विक्री केली जाते; पण सध्या बाजारपेठेत इतर भाजीपाल्याची आवक वाढल्याने कोबीच्या गड्ड्यांची विक्री अल्प दरात होऊ लागली.
दोन किलोचा गड्डा केवळ दोन रुपयाला विकला जात असल्याने वाहतूक खर्चही परवडत नाही. त्यामुळे कोबीची काढणी बंद केली असून, शेतातच त्याची कापणी करायचे ठरवले आहे.
यंदा पाऊसपाणी चांगले झाल्याने मोठ्या आशेने कोबीची लागवड केलेल्या राज्यभरातील शेतकऱ्यांवर पश्चातापाची वेळ आली आहे. भाव नसल्याने अनेकांनी ट्रॅक्टर फिरवून कोबी जमिनीतच पुरला. हीच वेळ या परिसरातील अनेक उत्पादकांवर आली आहे. थंडीचा मोसम कमी झाल्यानंतर हळूहळू कोबीचे दर वाढतील असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
कोबीला दर नसल्यामुळे पै-पाहुणे, मित्र यांना मोफत कोबी वाटला असून, राहिलेले गड्डे कापून त्याचठिकाणी टाकणार आहे. ऊसाला खत होईल.
रविराज नलवडे, शेतकरी
वाहतूक खर्चही परवडेना
दोन किलोचा गड्डा केवळ दोन रुपयाला विकला जात असल्याने वाहतूक खर्चही परवडत नाही. त्यामुळे कोबीची काढणी बंद केली असून, शेतातच त्याची कापणी करायचे ठरवले आहे.