मातीचा ढिगारा अंगावर पडून दोन कामगार ठार; कराड गावाच्या हद्दीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2022 11:17 PM2022-10-04T23:17:26+5:302022-10-04T23:17:57+5:30
दोघेजन कामगार एका बाजुस खड्ड्यामध्ये पाईप वेल्डींगचे काम करीत होते.
- अजय जाधव
उंब्रज- शिवडे ता. कराड गावाच्या हद्दीत महामार्गालगत गॅस पाइपलाइनच्या खड्यात पाइपच्या वेल्डिंगचे काम सुरू असताना शेजारील मातीचा ढिगारा अचानक कोसळला. यामध्ये दोन कामगार ठार झाले. ठार झालेल्या कामगारांची नावे साहिल कुमार ओमकार चाँद ( वय २६ ) रा पठाणकोट, पंजाब,सुखेदु बिकास बेरा (२२) रा वेस्ट बंगाल अशी आहेत.
याबाबत उंब्रज पोलीस ठाण्यात इंजिनिअर अमित कुमार बीपीन कुमार सिन्हा यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ए सी इ पाईप लाईन क्रॉन्ट्रक्ट प्रा. लिमिटेड या कंपनीचे महामार्गाच्या लगत गॅस पाईप वेल्डींगचे काम सुरू आहे.आज रात्री शिवडे ता. कराड गावचे हद्दीत कराड ते सातारा जाणारे हायवे रोडचे शेजारी असलेल्या एका ढाब्याचे समोर पाईप वेल्डींगचे काम चालु होते.
दोघेजन कामगार एका बाजुस खड्ड्यामध्ये पाईप वेल्डींगचे काम करीत होते. त्यावेळेस अचानक खड्ड्याचे शेजारी असलेली मातीचा ढिग घसरला व त्यामध्ये साहिल कुमार चाँद, सुखेदु बेरा हे मातीच्या ढिगा-याखाली दबले गेले. त्यावेळेस तेथे जमलेल्या लोकांच्या मदतीने त्यांना बाहेर काढले.मात्र ते जागीच ठार झाले होते.या घटनेची नोंद रात्री उशिरा उंब्रज पोलीस ठाण्यात झाली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय गोरड हे करत आहेत.