चिंताजनक! सातारा जिल्ह्यात दोन लाख हेक्टरवरील पेरणी बाकी, पावसाची प्रतीक्षा
By नितीन काळेल | Published: July 12, 2023 06:58 PM2023-07-12T18:58:26+5:302023-07-12T19:02:49+5:30
पावसाची प्रतीक्षा कायम
सातारा : जिल्ह्यात जुलैचा मध्य आलातरी पाऊस कमी असल्याने खरीप हंगामातील पेरणीला वेग येत नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे आतापर्यंत फक्त ३३ टक्के क्षेत्रावरच पेरणी झाली आहे. तर अजून जवळपास २ लाख हेक्टरवर पेरणी बाकी आहे. येत्या काही दिवसांत पाऊस पडला नाहीतर पेरणी १०० टक्के होणारच नाही. यामुळे शेतकऱ्यांचीही चिंता वाढली आहे.
जिल्ह्यात उन्हाळी पाऊस पडल्यानंतर जूनच्या पहिल्या पंधरवड्यात मान्सूनचा पाऊस पडतो. यंदा मात्र, वळवाच्या पावसाने हुलकावणी दिली. तसेच मान्सूनचा पाऊसही उशिरा दाखल झाला. आज १५ दिवस होऊनही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस पडलेला नाही. पश्चिम भागातच पाऊस पडल्याने भात लागण आणि पेरणी काही प्रमाणात झाली. मात्र, पूर्व भाग दुष्काळी असून या तालुक्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
जिल्ह्यातील खरीप हंगामाचे सर्वसाधारण क्षेत्र हे २ लाख ८८ हजार ४९४ हेक्टर आहे. यामध्ये सोयाबीनचे सर्वाधिक ७४ हजार ८०० हेक्टर निश्चित करण्यात आले आहे. यानंतर बाजरीचे ६० हजार ७३४ हेक्टर, भात ४४ हजार, खरीप ज्वारी ११ हजार हेक्टर, मका १५ हजार, भुईमूग २९ हजार ४३५ हेक्टर तर नागली, तूर, मूग, उडीद, तिळाचे क्षेत्र अत्यल्प आहे.
आतापर्यंतचा विचार करता एकूण क्षेत्राच्या ९५ हजार हेक्टरवरच पेरणी तसेच भात लागण झालेली आहे. काही भागात पाऊस नाही, तर कोठे अजून वापसा नसल्याने पेरणीला वेग नाही. आतापर्यंतच्या पेरणीत भाताची लागण १२ हजार ४०० हेक्टरवर झालेली आहे. याचे प्रमाण २८ टक्के इतके आहे. त्यानंतर ज्वारीची ५ हजार हेक्टरवर तर मकेची ४ हजार २०० हेक्टरवर पेर पूर्ण झाली आहे. त्याचबरोबर खरीपातील प्रमुख पीक म्हणून पुढे आलेल्या सोयाबीनची ४४ हजार हेक्टरवर पेर झाली आहे. टक्केवारीत याचे प्रमाण ६० आहे. त्यामुळे सोयाबीनची पेरणी १०० टक्के क्षेत्रावर होऊ शकते असा अंदाज आहे. तर भुईमुगाची १५ हजार हेक्टर म्हणजे ५० टक्के क्षेत्रावर पेर झालेली आहे.
बाजरीची ११ टक्के पेरणी...
खरीप हंगामात जिल्ह्यात बाजरी हेच प्रमुख पीक होते. पण, आता सोयाबीनचे क्षेत्र वाढत चालले आहे. यावर्षी बाजरीची ६० हजार हेक्टरवर पेरणीचा अंदाज होता. पण, आतापर्यंत ७ हजार हेक्टरवर पेर झाली. याचे प्रमाण फक़्त ११ टक्के आहे. त्यातच बाजरी ही प्रामुख्याने माण तालुक्यात ३१ हजार ५०० हेक्टरवर घेण्याचा अंदाज होता. त्यानंतर खटाव, फलटण, खंडाळा तालुक्यात बाजरी घेण्यात येते. पण, अद्यापही दमदार पाऊस नसल्याने शेतकरी यापुढे बाजरी पेरणीचे धाडस करणार नाहीत. त्यामुळे पेरणी ५० टक्क्यांपर्यंत तरी जाणार का याविषयी चिंता आहे.
पाटणमध्येच ६१ टक्के पेरणी...
जिल्ह्यातील खरीप पेरणी ३३ टक्के आहे. यामध्ये पाटण तालुक्यातच ६१ टक्के क्षेत्रावर पेर झाली आहे. या तालुक्यात २८ हाजर हेक्टरवर भात लागण आणि पेर आहे. तर सातारा तालुक्यात १३ हजार ४२० हेक्टरवर पेरणी झालेली आहे. पेरणीचे प्रमाण ४२ टक्के आहे. कऱ्हाड तालुक्याचे क्षेत्र ३८ हजार ५७७ हेक्टर असून ४३ टक्के पेर आहे. कोरेगाव तालुक्यात ७ हजार ८२६ हेक्टरवर पेरणी असून टक्केवारी ३७ च्या वर आहे.
खटाव तालुक्यात जवळपास ४६ हजार हेक्टर क्षेत्र असून १२ टक्केच पेरणी झाली. माण तालुक्यात ३९ हजार ६०६ हेक्टरपैकी साडे नऊ हजार हेक्टरवर बाजरीसह इतर पिकांची पेरणी झाली आहे. फलटण तालुक्यात ३ हजार ३१० हेक्टरवर, खंडाळ्यात १७ टक्के, वाई तालुक्यात २१ आणि महाबळेश्वर तालुक्यात ६० टक्के क्षेत्रावर पेरणी झालेली आहे.