दोन युवकांकडून गावठी कट्ट्यासह दोन जीवंत काडतुसे जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2019 03:03 PM2019-07-02T15:03:50+5:302019-07-02T15:06:52+5:30
कोरेगाव शहरातील एका हॉटेलमध्ये गावठी कट्टा विक्रीस घेऊन येणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह दोन जीवंत काडतुसे आणि दुचाकी असा सुमारे १ लाख ७ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
कोरेगाव : शहरातील एका हॉटेलमध्ये गावठी कट्टा विक्रीस घेऊन येणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह दोन जीवंत काडतुसे आणि दुचाकी असा सुमारे १ लाख ७ हजारांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला.
नवनाथ हिंदुराव लोहार (वय ३४, रा. कुमठे, ता. कोरेगाव), संदीप धनाजी पाटसुते (वय ३५, रा. मरळी, ता. पाटण) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, लोहार आणि पाटसुते हे दोघे कोरेगाव येथील एका हॉटेलमध्ये गावठी कट्टा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक सागर गवसणे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी आपल्या टीमसह रविवारी रात्री सापळा रचला.
दुचाकीवरून आलेल्या दोघांची पोलिसांनी झडती घेतली असता लोहारच्या खिशामध्ये एक गावठी कट्टा आणि दोन जीवंत काडतुसे पोलिसांना सापडली. या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेत आणल्यानंतर पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. या दोघांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात खुनाचा आणि फसवणुकीचा गुन्हा आणि कोरेगाव पोलीस ठाण्यात मारामारीसारखा गंभीर गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. मात्र, हे दोघे गावठी कट्टा कोणाला व कशासाठी विकणार होते, हे अद्याप त्यांच्या चौकशीत समोर आले नाही.
पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर गवसणे, सहायक फौजदार पृथ्वीराज घोरपडे, विलास नागे, हवालदार विनोद गायकवाड, पोलीस नाईक मोहन नाचण, राजकुमार ननावरे, नितीन भोसले, योगेश पोळ, संतोष जाधव, प्रवीण कडव, गणेश कापरे, धीरज महाडिक, केतन शिंदे, वैभव सावंत, मयुर देशमुख, मोहसीन मोमीन व गणेश कचरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.